Music Festival Pudhari
पुणे

Chandraprabha 2026 Music Festival: वाघोलीत २८ नोव्हेंबरला ‘चंद्रप्रभा २०२६’ संगीत महोत्सव; दिग्गज कलाकारांची सुरेल मैफल

उस्ताद तौफिक कुरेशी, साबिर खान आणि पं. आदित्य कल्याणपूर यांची विशेष प्रस्तुती; दिवंगत उस्ताद सुलतान खान व झाकीर हुसेन यांना संगीतमय आदरांजली

पुढारी वृत्तसेवा

पुणे: भारतीय शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा, वाद्यसंगीतातील नावीन्य आणि दिग्गज कलाकारांच्या सुरेल सादरीकरणातून संगीतप्रेमींना अविस्मरणीय सांगीतिक अनुभव देणाऱ्या 'चंद्रप्रभा २०२६' या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या वतीने संस्थेचे संस्थापक दिवंगत सद्‌गुरू प्रभाकर सरदेशमुख महाराज आणि ज्येष्ठ सतारवादक पंडित चंद्रकांत सरदेशमुख यांच्या स्मरणार्थ हा महोत्सव आयोजित केला आहे. शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) सायंकाळी ५ ते रात्री ९.३० या वेळेत वाघोली येथील भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या क्रीडांगणावर हा संगीत सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमासाठी 'पुढारी' माध्यम समूह माध्यम प्रायोजक आहे.

यंदा या महोत्सवाचे तिसरे वर्ष असून, नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासह दिग्गज कलाकारांच्या कलेचा आनंद रसिकांना घेता यावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. भारतीय संगीत परंपरेतील विविध वाद्यांचे वैशिष्ट्य, शास्त्रीय संगीताची समृद्धता आणि नव्या संगीतप्रयोगांची अनुभूती या महोत्सवातून मिळणार आहे. प्रभाकर सरदेशमुख महाराज यांचे अध्यात्म आणि आयुर्वेद क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण होते.

तसेच ते संगीतज्ज्ञही होते, तर पंडित चंद्रकांत सरदेशमुख हे प्रसिद्ध सतारवादक होते. या दोन महान कलाकारांच्या स्मृती जपण्याबरोबरच संगीतकलेला प्रोत्साहन देण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला जात असल्याचे ट्रस्टचे विश्वस्त सुश्रुत सरदेशमुख यांनी सांगितले. या महोत्सवात संगीतविश्वातील दोन दिग्गज कलाकार दिवंगत उस्ताद सुलतान खान आणि उस्ताद झाकीर हुसैन यांच्या स्मृतींना संगीतमय आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.

दोन सत्रांत रंगणार संगीत मैफल

दोन सत्रांमध्ये होणाऱ्या या महोत्सवाच्या पहिल्या सत्राची सुरुवात अक्षय सोमण यांच्या एकल व्हायोलिनवादनाने होणार आहे. त्यानंतर 'गुरुकृपा व्हायोलिन ब्रीथलेस बँड'ची विशेष प्रस्तुती होईल. या सादरीकरणात व्हायोलिन, बासरी, गिटार, तबला, की-बोर्ड, ड्रम्स आणि पर्कशन अशा विविध वाद्यांचा संगम अनुभवायला मिळणार आहे. राजसी सोमण, अझरुद्दीन शेख, अभिजित यादव, अभिजित बारटक्के, शांतनू पांडे आणि रोहन वणगे हे कलाकार या सादरीकरणात सहभागी होणार आहेत. दुसऱ्या सत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार उस्ताद तौफिक कुरेशी (जेम्बे), उस्ताद साबिर खान (सारंगी) आणि पंडित आदित्य कल्याणपूर (तबला) यांची विशेष सांगीतिक प्रस्तुती होणार आहे.

सद्‌गुरू प्रभाकर सरदेशमुख महाराज आणि पं. चंद्रकांत सरदेशमुख यांच्या स्मृती जपण्यासह संगीत क्षेत्रासाठी एक चांगले व्यासपीठ निर्माण व्हावे, या उद्देशाने 'चंद्रप्रभा' महोत्सवाची संकल्पना पुढे आली. भारतीय संस्कृतीत संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या संगीत परंपरेचा सन्मान करताना नवोदित कलाकार आणि संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकार या दोघांनाही एकाच व्यासपीठावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांच्या कलेतून रसिकांना संगीताचा समृद्ध अनुभव मिळावा आणि महान कलाकारांच्या स्मृतींना स्वरांजली अर्पण करता यावी, हा उद्देश आहे. माझे वडील प्रा. डॉ. सदानंद सरदेशमुख हे ट्रस्टचे अध्यक्ष असून, भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट आणि सरदेशमुख कुटुंबीय मिळून हा महोत्सव आयोजित करत आहोत.
सुश्रुत सरदेशमुख, विश्वस्त, भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT