पुणे: गोकुळच्या रणांगणात काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने १३ जागा जिंकत सत्ता मिळवली. या निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या नेत्यांनी सर्व २५ जागा आपल्याच निवडून येतील असा दावा केला होता. यादरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही २५-० असा एकतर्फी विजयाचा दावा केला होता. निकालानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आज (दि. २३) माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "माझ्या वक्तव्याची चेष्टा करतात. गिरणी कामगाराचा मुलगा राज्याचा राजकारणात वर आला हे काही लोकांना चालत नाही. कोणी माझ्या तेलावर बोलतं, कोणी माझ्या केसांवर बोलतं इतर राजकीय लोकांवर सुद्धा असं बोलता का? असा सवाल करत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी कोल्हापुरातील मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी मतदानासाठी आलेल्या मतदारांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. "महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी होतील. शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाने उमेदवार दिला आहे. मात्र त्याचा काही उपयोग होणार नाही. पुण्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील दोन्ही उमेदवार एकतर्फी ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते घेऊन विजयी होतील," असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
'गोकुळ' दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीकडे चार हजार चारशे ठराव असल्याचा दावा नेतेमंडळी करत होती. मग मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलाविरुद्ध षड्यंत्र कोणी रचले? मुश्रीफ यांनी केलेल्या आरोपांनुसार संशयाची सुई महायुतीतील नेत्यांकडेच फिरत आहे. त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन करून आगामी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत काय भूमिका घ्यायची हे ठरवावे, असा टोला काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत लगावला.
नवीद मुश्रीफ यांच्या पराभवावर भाष्य करताना मंत्री मुश्रीफ यांनी त्यांच्याविरुद्ध षड्यंत्र रचल्याचा आरोप केला होता. यावर प्रतिक्रिया देताना आ. पाटील बोलत होते. आ. पाटील म्हणाले, निवडणुकीपूर्वी महायुतीतील नेते आपल्याकडे चार हजार चारशे ठराव असल्याचे सांगत होते. असे असताना नवीद मुश्रीफ यांच्याविरुद्ध षड्यंत्र कोणी रचले, याचा शोध त्यांनी स्वतः घ्यावा. आता तालुकानिहाय मतदानाची आकडेवारीही समोर आली आहे. मुश्रीफ यांनी केलेल्या आरोपांचा विचार करता, संशयाची सुई महायुतीतील नेत्यांकडेच जाते. समविचारी आघाडीचा नेता म्हणून आपल्या पॅनेलमधील सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणे ही आपली भूमिका होती. मात्र, महायुतीमध्ये नेमके कोणी कोणाविरुद्ध षड्यंत्र रचले, याचे आत्मपरीक्षण मुश्रीफ यांनी करावे.