Gokul Election 2026 | गोकुळमध्‍ये ‘समविचारी’चे विजयी सीमोल्‍लंघन

सतेज पाटील आघाडीने जिंकल्‍या गोकुळच्‍या १३ जागा; भाजप २, जनसुराज्‍य २ तर शिवसेना-राष्ट्रवादीला प्रत्‍येकी ४ जागा
(छाया : मिलन मकानदार)
कोल्‍हापूर : गोकुळ निवडणुकीत समविचारी आघाडीने सत्ता मिळविल्‍यानंतर आ. सतेज पाटील यांच्यासह विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी विजयाची खूण करून आनंद व्यक्त केला.
Published on: 
Updated on: 

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ ‘गोकुळ’च्‍या रणांगणात काँग्रेसचे नेते आ. सतेज पाटील यांच्‍या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने सोमवारी विजयाचे सीमोल्‍लंघन केले. चुरशीने झालेल्‍या लढतीत ‘समविचारी’ने १३ जागा जिंकत सत्ता मिळविली; तर महायुतीचा रथ १२ जागांवर रोखला. माजी चेअरमन नविद मुश्रीफ, विश्‍वास पाटील, अरुण डोंगळे या दिग्‍गजांसह शौमिका महाडिक, माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर यांनाही पराभवाचा धक्‍का बसला. निवडणुकीत भाजपला २, जनसुराज्‍यला २ तर शिवसेना व राष्ट्रवादीला प्रत्‍येकी ४ जागा मिळाल्‍या.

फेरमतमोजणीची मागणी अणि किरकोळ वादावादीनंतर सोमवारी रात्री ९.३० वाजता अंतिम निकाल जाहीर झाला. विजयानंतर आ. सतेज पाटील समर्थकांनी रमणमळा व अजिंक्‍यतारा कार्यालय येथे एकच जल्‍लोष केला. आरोप-प्रत्‍यारोप आणि न्‍यायालयीन प्रक्रियेमुळे गाजलेल्‍या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्‍याचे लक्ष लागले हाेते.

गोकुळसाठी रविवारी ९९.९६ टक्‍के मतदान झाले होते. सोमवारी रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे सकाळी आठ वाजता ३५ टेबलांवर केंद्रनिहाय मतमोजणीला सुरुवात झाली. सीलबंद केलेल्‍या मतपेट्या बाहेर काढल्‍यानंतर पावणेनऊच्‍या सुमारास प्रत्‍यक्षात मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीच्‍या टप्‍प्‍यात सर्वसाधारण गटात महायुतीचे १७ तर समविचारीचे शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे हे तीन उमेदवार आघाडीवर होते. मात्र दुसर्‍या फेरीनंतर समविचारी आघाडीने मताधिक्‍य घेण्‍यास सुरुवात केली. तीनवरून त्‍यांचे सहा उमेदवार आघाडीवर गेले. अखेर सर्वसाधारण गटातून त्‍यांचे आठ उमेदवार विजयी झाले.

राखीवमध्ये समविचारीचे वर्चस्‍व

महिला राखीव गटातून शौमिका महाडिक यांना पराभवाचा धक्‍का बसला. अंजना रेडेकर, भाग्‍यश्री डोंगळे यांनी विजय मिळविला. अनुसूचित जातीमधून माजी आ. राजू आवळे, भटके विमुक्‍तमधून बयाजी शेळके आणि इतर मागास गटातून नविद मुश्रीफ यांचा धक्‍कादायक पराभव करत शशिकांत खोत यांनी विजय मिळविला. दरम्यान, विश्‍वास पाटील व युवराज पाटील यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्‍यांचा अर्ज फेटाळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news