पुणे

चांदणी चौक होणार कोंडीमुक्त! नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

अमृता चौगुले

पुणे : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकात होणार्‍या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका झाली आहे. अनेक वर्षे या समस्येने नागरिक त्रस्त झाले होते. त्यातून सुटका करण्यासाठी थेट 400 कोटी रुपये खर्चून येथे मोठा प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे.

पुणे वाहतूक शाखेने केलेल्या अभ्यासात दररोज 0.281 दशलक्ष वाहने या चौकातून जातात. चांदणी चौक आणि इतर भागांतील नागरी पायाभूत सुविधांच्या कामांमुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा फटका गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसला. त्यानंतर येथील कामाला गती आली. पुलाच्या कामामध्ये जुना पूल अडसर ठरत होता. तो जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनात 30 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 1 वाजता स्फोट करून पाडण्यात आला. त्यानंतर कामाला गती मिळाली.

केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी 1 मे रोजी पुलाचे उद्घाटन केले जाणार असल्याचे जाहीर केले होते. पण, ही 'डेडलाइन' उलटून गेली. आता या पुलाचे उद्घाटन 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. चांदणी चौकात एकूण 8 रॅम्प उभारण्यात आले असून, या प्रकल्पाचे उद्घाटन 28 फेब्रुवारी 2019 रोजी झाले. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कामाला विलंब झाला.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील आपल्या गावी जात असताना त्यांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावला. नितीन गडकरी यांनी 1 मे 2023 रोजी प्रकल्पाचे उद्घाटन होईल, असे जाहीर केले होते. मात्र, काम पूर्ण न झाल्याने उद्घाटनाची तारीख वाढविण्यात आली होती. आता 12 ऑगस्ट रोजी उद्घाटन होणार आहे.

  • 28 फेब्रुवारी 2019 ला भूमिपूजन
  • प्रकल्पावर 400 कोटी खर्च
  • 12 ऑगस्ट 2023 रोजी वाहनांसाठी पूल होणार खुला
  • प्रकल्पात विविध 8 रॅम्प तयार
  • कोथरूडकडून मुळशीकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग
  • वाहतूक कोंडीत मुख्यमंत्री अडकल्यानंतर कामाला गती
  • प्रकल्पातील सर्व रस्त्यांची
  • लांबी 17 किलोमीटर

चांदणी चौकात 14 मार्गिका

सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी प्रतितासाला सुमारे एक लाख वाहने जातात, तर इतर वेळी प्रतितास तीस हजार वाहने जातात. चांदणी चौकात जुन्या पुलाखाली चार लेनचा अरुंद रस्ता होता. त्यामुळे सहा लेनमधून आलेली वाहने पुलाजवळ पोहोचल्यानंतर चार लेनमधून जात असल्याने तिथे वारंवार वाहतूक कोंडी होत असे. त्यामुळे पुलालगतचा पाषाण फोडून तिथे रस्तारुंदीकरण करण्यात आले. एनडीए ते पाषाण या नवीन पुलावर 6 मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत, तर मुख्य मार्गावर आता 14 मार्गिका करण्यात आल्या आहेत. तसेच अन्य चार बाजूने वाहने चांदणी चौकात येत होती, त्या मार्गांवर ये-जा करणार्‍या वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आले आहेत.

असे आहेत रॅम्प…

  • रॅम्प 1 – मुळशी ते सातारा
  • रॅम्प 2- मुळशी ते मुंबई
  • रॅम्प 3 – मुळशी ते पाषण
  • रॅम्प 4- सातारा-कोथरूड ते मुळशी
  • रॅम्प 5- पाषण ते मुंबई
  • रॅम्प 6 – पाषण ते सातारा
  • रॅम्प 7 – सातारा-कोथरूड ते पाषाण
  • रॅम्प 8 – सातारा ते मुळशी

साडेचार वर्षांत काम पूर्ण

गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी फोडावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात होती. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत मोठा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तब्बल 397 कोटी 60 लाख 94 हजार 220 रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. या प्रकल्पाचे भूमिपूजन 28 फेब—ुवारी 2019 रोजी झाले. याचे काम पूर्ण होण्यासाठी साडेचार वर्षांचा कालावधी लागला आहे.

एनडीए चौकात रणगाडा…

चांदणी चौकात (एनडीए चौक) येथे सुशोभीकरण करण्यात आले असून, रणगाडा उभा करण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT