Chandani Chowk Traffic Pudhari
पुणे

Chandani Chowk Traffic Congestion: ८६५ कोटी खर्चूनही चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कायम; नव्या बॉटलनेकमुळे वाहनचालक त्रस्त

भूगाव रस्त्याचा प्रकल्प पुन्हा रखडला; पौड रस्त्यावर मेट्रोचे काम, अनधिकृत पार्किंग आणि अपुऱ्या पादचारी सुविधांमुळे वाहतुकीचा ताण

पुढारी वृत्तसेवा

निनाद देशमुख

पुणे: चांदणी चौकातील जुन्या पुलाच्या काळात मुंबई-बंगळुरू महामार्गावरील सरळ वाहतूक आणि कोथरूड, बावधन, पाषाण, एनडीए, भूगाव तसेच मुळशीच्या दिशेने वळणारी वाहने एकमेकांना छेदत होती. नव्या इंटरचेंजमुळे हे वाहनप्रवाह मोठ्या प्रमाणात वेगळे झाले. त्यामुळे सामान्य परिस्थितीत चांदणी चौक ओलांडण्यासाठी लागणारा वेळ कमी झाला. मात्र, वाहतुकीचा दबाव आता चौकापुरता मर्यादित राहिला नाही. उलट त्यावर अनेक नवे बॉटलनेक तयार झाल्याने वाहतुकीवर प्रचंड ताण आला आहे.

चांदणी चौकावर स्थानिक वाहतुकीचा प्रचंड ताण पडल्याने त्यावर ८६५ कोटी खर्च करूनही समस्या जैसे थे आहे. एका ठिकाणी अडथळा निर्माण झाला, तरी त्याचे पडसाद संपूर्ण मार्गावर उमटतात. याचे उदाहरण १३ सप्टेंबरला पाहायला मिळाले. गणेशोत्सवानिमित्त वाहनांची संख्या वाढल्याने नवले पूल ते चांदणी चौकादरम्यान तब्बल ७ तास वाहतूक कोंडी झाली. महामार्ग ठप्प झाल्यानंतर वाहनचालकांनी सेवा रस्त्यांचा वापर केला, त्यामुळे सेवा रस्ते आणि वारजेतील अंतर्गत वाहतूकही अडकली. तसेच दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अचानक वाढल्याने देखील या मार्गावर मोठ्या रांगा लागल्या होत्या.

भूगाव रस्त्याचा प्रकल्प पुन्हा रखडला

चांदणी चौकातून भूगाव, भुकूम, पिरंगुट, मुळशी आणि कोकणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढत आहे. या मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी चांदणी चौक ते भूगाव यादरम्यान २.२ किलोमीटरच्या पट्ट्यात रुंद रस्ता, उड्डाणपूल, राम नदीवरील पूल, पीव्हीपीआयटी महाविद्यालयाजवळ ४३० मीटरचा भुयारी मार्ग आणि सेवा रस्त्यांचे नियोजन केले होते. त्यासाठी महापालिकेने १६४ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. मात्र, ही निविदा २ सप्टेंबर रोजी रद्द झाली. प्रकल्पासाठी सात दिवसांत चोवीस तास वाहतूक सर्वेक्षण करण्यात आले नव्हते. माती परीक्षण, बोअर लॉग, खासगी व वनजमिनींचे मूल्यांकन आणि स्वतंत्र संस्थेचा व्यवहार्यता अहवालही अपूर्ण असल्याचे समोर आले. नव्याने तांत्रिक अभ्यास आणि खर्चाचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर फेरनिविदा काढावी लागणार आहे. त्यामुळे या मार्गावरील कोंडी कमी करण्याची उपाययोजना पुन्हा लांबणीवर पडली आहे.

वाहन बंद पडले, तर तत्काळ पर्याय नाही

चांदणी चौकातील वाहतूकव्यवस्था सुरळीत राहणे मुख्यतः सर्व मार्गिका खुल्या असण्यावर अवलंबून आहे. एखादे अवजड वाहन बंद पडल्यास किंवा अपघात झाल्यास त्याला वळसा घालण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध राहत नाही. परिणामी, एका मार्गिकेतील अडथळा काही मिनिटांत मोठ्या रांगेत रूपांतरित होतो. अशा घटनांसाठी कायमस्वरूपी क्रेन, टोइंग व्हॅन, आपत्कालीन प्रतिसाद पथक आणि पर्यायी वाहतूक व्यवस्थेची आवश्यकता आहे.

पौड रस्त्यावर मेट्रो, पार्किंगचा अडथळा

  • चांदणी चौकातील महामार्गावरील प्रवाह सुधारला असला, तरी पौड रस्त्यावर वेगळी समस्या आहे. रस्त्याची मर्यादित रुंदी, चढ-उतार, अनधिकृत पार्किंग आणि मेट्रोच्या कामासाठी करण्यात आलेल्या बॅरीकेडिंगमुळे उपलब्ध रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी कोथरूड-चांदणी चौक प्रवासात वाहनांच्या रांगा लागतात.

  • वनाज-चांदणी चौक मेट्रो विस्ताराची लांबी १.१२ कि.मी. असून, कोथरूड बसडेपो आणि चांदणी चौक अशी दोन स्थानके प्रस्तावित आहेत. येथील मेट्रोचे काम सुरू झाले आहे.

  • मेट्रोमुळे भविष्यात खासगी वाहनांचा वापर कमी होऊ शकतो; मात्र, मेट्रोस्थानक, पादचारी पूल, पीएमपी बस, एसटी आणि खासगी बसथांबे यांची एकत्रित जोडणी झाली, तरच त्याचा अपेक्षित फायदा मिळेल.

पादचाऱ्यांचा विचार प्रकल्पानंतर

  • चांदणी चौकातील महामार्ग रुंद झाला आणि वाहनांचा वेग वाढला; मात्र, पादचाऱ्यांना महामार्ग ओलांडण्यासाठी सुरक्षित व्यवस्था वेळेत उपलब्ध झाली नाही.

  • विशेषतः एसटी किंवा खासगी बस पकडण्यासाठी जाणारे प्रवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बावधनमधील रहिवाशांना धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडावा लागत होता.

  • त्यामुळे स्वतंत्र पादचारी पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. १२५ मीटर लांब आणि ६.६ मीटर रुंद पुलाचे काम जून २०२६ मध्ये अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले होते.

  • तो जूनअखेरीस खुला करण्याचे उद्दिष्ट होते; मात्र, अजूनही या पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन हा पूल ओलांडावा लागत आहे.

  • पादचारी पूल केवळ जिन्यांपुरता मर्यादित न ठेवता त्याला लिफ्ट, दिव्यांगांसाठी सुविधा, पुरेशी प्रकाशव्यवस्था, सीसीटीव्ही तसेच बसथांबे आणि प्रस्तावित मेट्रोस्थानकाशी जोडणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT