पुणे : कोकणातून पुण्यात प्रवेश करताना चांदणी चौक परिसरात होणारी भीषण वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने मोठी पावले उचलली आहेत.
चांदणी चौक ते भूगाव या मार्गावर उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्याचा निर्णय इस्टिमेट कमिटीने मंजूर केला. या कामांसाठी तब्बल 203 कोटी निधीचा अंदाज आहे. आवश्यक असलेल्या जागेपैकी 80 टक्के भूखंड ताब्यात आल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.
चांदणी चौक हे पुण्याचे पश्चिमेकडील प्रमुख प्रवेशद्वार आहे. पीरंगूट ते चांदणी चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने या मार्गावरील कोंडी दूर करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. या ठिकाणी रस्ते रुंदीकरणाचे काम महापालिकेने केले आहे. पुढे भूगावपर्यंत साधारण दोन किलोमीटर अंतरात महापालिकेची हद्द असून, विकास आराखड्यात 60 मीटर रस्त्याचा समावेश आहे. पुढील हद्दीनंतर पीएमआरडीएचा प्रस्तावित रिंग रोड येणार असून, तो थेट राष्ट्रीय महामार्गाशी जोडला जाणार आहे. या वाढत्या संपर्कामुळे भविष्यात वाहतूकप्रवाह आणखी वाढणार असल्याने उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरची गरज भासली होती.
गेल्या काही वर्षांत या भागाची लोकसंख्या झपाट्याने वाढत 90 हजारांच्या आसपास पोहचली आहे. आगामी काळात ती दोन ते तीन लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेत महापालिकेच्या प्रकल्प विभागाने दोन टप्प्यांत पूल व ग््रेाड सेपरेटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी दिली.
रस्त्यावरच्या प्रमुख तीन चौकात ही कामे होणार आहेत. पीव्हीपीआयटी कॉलेज चौकातील ग्रेड सेपरेटर 430 मीटर लांबीचा व 23.2 मीटर रुंद असून, यातील 120 मीटर भाग आरसीसी रचनेचा असणार आहे. या प्रकल्पावर 27 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तर एम्बोसिया चौक व पाटीलनगर चौक येथे 870 मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारला जाणार असून, त्यासाठी 82 कोटी रुपये खर्च येणार आहे. हा पूल सुरू झाल्यावर चांदणी चौक-भूगाव दरम्यान प्रवास वेळेची मोठी बचत होणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
या मार्गावरून जाण्यासाठी राम नदीवरील नवीन 30 मीटर लांबीचा आणि 70 मीटर रुंदीचा पूल बांधण्यात येणार आहे. नदी ओलांडताना होत असलेली कोंडी कमी करण्यासाठी हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे. प्रकल्प सुरू करण्यापूर्वी 80 टक्के जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.पृथ्वीराज बी. पी, अतिरिक्त आयुक्त