Crime News Pudhari
पुणे

Pune Crime News: प्रेम प्रकरणातून ब्लेडने चिरला तरुणीचा गळा; प्रकृती चिंताजनक

Chandan Nagar blade attack case: चंदननगर परिसरातील घटना; आरोपी फरार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: प्रेमप्रकरणातून प्रेयसीचा ब्लेडने गळा चिरून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पठारेवस्ती, चंदननगर परिसरात घडली. उजालादेवी असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिची प्रकृती सध्या चिंताजनक असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी दिलीप राठोड (वय 22) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि. 29) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याबाबत तरुणीचा भाऊ भगतसिंग याने फिर्याद दिली आहे.

आरोपी दिलीप राठोड आणि जखमी तरुणी उजालादेवी हे विमाननगर येथील एका मॉलमध्ये एकत्र काम करत होते. तेथे दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद होते. त्याच कारणातून बुधवारी रात्री दिलीप हा तरुणी राहत असलेल्या पठारेवस्ती, चंदननगर येथे आला. त्याने घरात घुसून तरुणीच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. तरुणीवर हल्ला केला तेव्ही ती एकटीच घरी होती. तिचा भाऊ आणि भावाची बायको बाहेर कामावर गेले होते. त्यानंतर तो पसार झाला.

तरुणीने फोन करून आपल्या भावाला ही माहिती दिली की, ‌‘तू लवकर घरी ये. मला एका मुलाने मारले आहे. खूप लागले आहे. माझ्या गळ्यातून आवाज येत नाही.‌’ त्यानंतर तरुणीने आपल्या भावालाच व्हिडीओ कॉल केला. त्या वेळी ती भावाला रक्तबंबाळ अवस्थेत दिसली. भावाने घराकडे धाव घेतली. तोपर्यंत तेथील काही नागरिक आणि तरुणीचे नातेवाईक जमा झाले होते. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. तरुणीला तिला कोणी मारले, असे विचारले तेव्हा तिला बोलता येत नव्हते. तिने इशारा करून पेन आणि कागद मागितला. त्यावर तिने दिलीप राठोड असे लिहिले. घरात घुसून तरुणीवर ब्लेडने वार करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अद्याप आरोपी दिलीप राठोड फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT