Chakan Traffic Congestion Pudhari
पुणे

Chakan Traffic Congestion: चाकणच्या वाहतूक कोंडीला ‘ब्रेक’; खड्डे, पार्किंग, कचरा आणि अतिक्रमणांवर तातडीने कारवाई

१०० अतिरिक्त सुरक्षा जवानांची नियुक्ती; ३१ ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्तीचे आदेश, ट्रक पार्किंगसाठी स्वतंत्र जागा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: चाकण परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, पार्किंग, कचरा व्यवस्थापन आणि अतिक्रमणांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या. चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा घेताना त्या बोलत होत्या.

रातील रस्त्यांवरील खड्डे आणि साइडपट्ट्यांची दुरुस्ती ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कामात दिरंगाई झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला. वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची पाहणी करून अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे.

१०० सुरक्षा जवानांची नियुक्ती

चाकणचा वाढता औद्योगिक विस्तार आणि नागरीकरण लक्षात घेता सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १०० अतिरिक्त जवान पुढील आठवड्यापासून तैनात करण्यात येणार आहेत. आवश्यकतेनुसार नवीन पोलिस ठाणी उभारण्याबाबतही कार्यवाही सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

दर शुक्रवारी आढावा

वाहतूक आणि पायाभूत सुविधांबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी दर शुक्रवारी संबंधित विभागांची बैठक घेण्यात येणार आहे. वाहनांसोबतच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी वॉकवे आणि सुरक्षित रस्त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. रस्ते, वाहतूक, पार्किंग, सुरक्षा, कचरा, अतिक्रमण, गृहनिर्माण सोसायट्या आणि शाळांशी संबंधित प्रश्नही टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येणार आहेत. चाकण हे देश-विदेशातील उद्योजक आणि नागरिकांचे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असल्याने येथील स्वच्छता, सुरक्षा आणि पायाभूत सुविधा दर्जेदार असणे आवश्यक आहे. त्यासाठी एमआयडीसी, पीएमआरडीए, पोलिस प्रशासन आणि इतर संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून चाकणचा विकास साधावा, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

ट्रक पार्किंगसाठी जागा सुरू करणार

एमआयडीसी परिसरातील उपलब्ध पार्किंगच्या जागा एका आठवड्यात सुरू करून रस्त्यावर उभे राहणारे ट्रक तेथे हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गर्दीच्या वेळेत जड वाहनांवर निर्बंध आणण्याबरोबरच औद्योगिक कंपन्यांच्या शिफ्टच्या वेळांमध्ये बदल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

अतिक्रमणांवर महिनाभरात कारवाई

चाकणमधील अतिक्रमणांचा प्रश्न प्राधान्याने हाती घेण्यात येणार असून, येत्या शुक्रवारपासून अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू करून महिनाभरात ती पूर्ण करण्याचे नियोजन आहे. अतिक्रमण काढताना कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. नागरिक, उद्योजक आणि लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

१९ गावांसाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प

चाकणमध्ये प्रवेश करताना रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा आणि प्लास्टिक दिसणे ही गंभीर बाब असल्याचे पवार यांनी नमूद केले. एमआयडीसी आणि परिसरातील १९ गावांसाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. प्लास्टिक कचऱ्यावरही तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT