Chakan Dog Attack Pudhari
पुणे

Chakan Stray Dog Attack: चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा भीषण हल्ला; महिलेचा मृत्यू, सीसीटीव्हीत उघड झाला थरार

आंबेठाण चौकाजवळ मध्यरात्री सहा कुत्र्यांच्या झुंडीचा हल्ला; पंचक्रोशीत भटक्या कुत्र्यांच्या दहशतीची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

चाकण: चाकण शहरात पुणे नाशिक महामार्गाच्या लगत आंबेठाण चौकाच्या जवळील उड्डाणपुलाच्या लगत महिलेचा विवस्त्र व शरीराचे लचके तोडलेला मृतदेह सोमवारी (दि. १६ मार्च) मिळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी या भागात असलेल्या सीसीटीव्हीची तपासणी केली . एका दुकानाच्या समोरील सीसीटीव्ही दृश्य पाहिल्यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. आपण पाहतोय, ते खरे आहे, यावर कुणाचाही विश्वास बसला नाही. अर्धा डझन कुत्री महिलेच्या अंगाचे लचके तोडत होते. महिलेच्या अंगातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाला होता. हिंस्र भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

शोभा विजय वाघमारे ( वय ३२, सध्या रा. चाकण , मूळ रा. देगलूर, जि. नांदेड ) असे या घटनेत ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास संबंधित महिला पुणे नाशिक महामार्गाच्या लगत आंबेठाण चौकाच्या जवळील उड्डाणपुलाच्या खालील सेवा रस्त्याने जात असताना सुमारे ६ कुत्र्यांनी महिलेवर हल्ला केला. महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला , मात्र कुत्र्यांच्या झुंडीपुढे महिला अपयशी ठरली. मोकाट कुत्र्यांचा झुंड पाहून महिलेने दगड उचलले मात्र सहा कुत्र्यांनी एकाच वेळी हल्ला चढवल्याने महिलेला प्रतिकार करणे अशक्य झाले. कुत्र्यांच्या टोळक्याने महिलेच्या अंगावरील सर्व वस्त्र फाडून टाकली व अंगाचे लचके तोडले. हात-पाय अन् तोंड-मान सगळ्या अंगावर चावे घेतले. सुमारे १५ मिनिट हा थरार सुरु होता. मोठा रक्तस्राव व वेदना असह्य झाल्यामुळे महिलेने जागेवरच प्राण सोडले.

आज सोमवारी १६ मार्च २०२६ रोजी सकाळी या भागातील नागरिकांनी विवस्त्र अवस्थेतील महिलेचा मृतदेह पाहून चाकण उत्तर पोलिसांना घटनेची माहिती दिली. महिलेला विवस्त्र करून अत्याचार व खून केल्याची केल्याची चर्चा परिसरात सुरु होती. चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन मोरखंडे, पोलीस उपनिरीक्षक देवराम बुरुड, भैरोबा यादव, महेश कोळी, अक्षय सांडभोर आदी पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही तपासल्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची बाब धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित महिलेच्या नातेवाईकांचा शोध चाकण पोलिसांकडून घेतला जात आहे.

चाकण पंचक्रोषित भटक्या कुत्र्यांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भटक्या कुत्र्यांच्या या झुंडींच्या हल्ल्यात मुलं, महिला अन् वृद्ध माणसे जखमी होतात. संपूर्ण चाकण आणि पंचक्रोषित हा विषय अत्यंत गंभीर झालाय. ३२ वर्षीय महिलेचा भटक्या कुत्र्यांनी जीव घेतलाय. महिलेच्या अंगाचे अक्षरश लचके तोडले.

लांडग्यांचा संकर

सकाळी हीच हल्लेखोर कुत्री पुन्हा महिलेला ठार केलेल्या ठिकाणी घिरट्या घालताना दिसत होती. हि हिंस्त्र कुत्री म्हणजे कुत्रे आणि लांडग्यांमध्ये जैविक संकर असल्याचा संशय निर्माण झाला आहे. या अत्यंत हिंस्त्र भटक्या कुत्र्यांमुळे लांडगा आणि कुत्रा यांच्यातील संकर पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. मानवावर हल्ला करून ठार करणारी हि कुत्री म्हणजे लांडग्याची नवी प्रजात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

दरम्यान चाकण आणि पंचक्रोशीतील गावांमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक नागरिक जखमी होत आहेत. चाकण, मेदनकरवाडी , नाणेकरवाडी, खराबवाडी भागात भटक्या कुत्र्यांकडून लहान मुलांसह जेष्ठ नागरिकांवर हल्ले होत आहेत. संपूर्ण चाकण पंचक्रोशी मध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. मागील काही दिवसात भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडलेले नागरिक तसेच रात्रीचे जेवण झाल्यानंतर फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना आता अशा हिंस्त्र प्राण्यांच्या दहशतीत बाहेर पडावे लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT