चाकण: खेड तालुक्यातील चाकण औद्योगिक परिसर आणि पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये अवैध गावठी दारूनिर्मितीचा व्यवसाय अजूनही सुरू असल्याचे चित्र आहे. पोलिसांकडून वेळोवेळी कारवाया होत असल्या, तरी पोलिसांची पाठ फिरताच अनेक ठिकाणी हातभट्ट्या पुन्हा सुरू होत असल्याने हा अवैध व्यवसाय रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
चाकण, महाळुंगे, मोई, पठारवाडी, वाकी, निघोजे आदी परिसरात यापूर्वी शेकडो वेळा गावठी दारूभट्ट्यांवर कारवाया करण्यात आल्या आहेत. मात्र, या व्यवसायामागील मुख्य साखळीपर्यंत कारवाई पोहोचत नसल्याने अवैध दारूनिर्मितीचे जाळे कायम असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी महिलांकडूनही हा व्यवसाय चालविला जात असल्याचे आढळून आले आहे. काही महिलांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असली, तरी त्यानंतरही अवैध धंदे सुरू असल्याच्या नोंदी पोलिसांकडे आहेत.
चाकण परिसरात झपाट्याने औद्योगिकीकरण आणि शहरीकरण होत असून, विविध राज्यांमधून तसेच ग््राामीण भागांतून मोठ्या प्रमाणावर कामगार येथे येत आहेत. कंत्राटी कामगार, बांधकाम मजूर, वाहनचालक आणि कष्टकरी वर्गामध्ये गावठी दारूची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने या अवैध व्यवसायाला खतपाणी मिळत असल्याचे सांगितले जाते.
आडवळणाच्या ठिकाणी हातभट्ट्यांचे जाळे
गर्द झाडी, दगडांच्या खाणी, नदीकाठ आणि पाण्याची उपलब्धता असलेल्या निर्जन भागांमध्ये गावठी दारूच्या हातभट्ट्या उभारल्या जात आहेत. या दारूमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, व्यसनाधीनतेमुळे सामाजिक आणि आर्थिक समस्या वाढत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. अवैध दारू व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असल्याने काही गुन्हेगारी प्रवृत्तींनाही त्याचे पाठबळ मिळत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या व्यवसायाविरोधात अधिक प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाईची गरज व्यक्त केली जात आहे.
‘मोबाईल हातभट्ट्यां’चा नवा फंडा
अवैध दारूनिर्मितीसाठी आता काही ठिकाणी ‘मोबाईल हातभट्ट्यां’चा वापर केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. दारूनिर्मितीसाठी लागणारे साहित्य टेम्पो किंवा छोट्या वाहनांमधून मध्यरात्री निर्जन भागात नेले जाते. पहाटेपर्यंत दारू तयार करून त्याचे वितरण साखळी पद्धतीने केले जाते. या व्यवसायासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वापर होत असून, दररोज नवीन ठिकाणी हातभट्ट्या उभारल्या जात असल्याने पोलिसांनाही या ठिकाणांचा मागोवा घेणे कठीण जात आहे. याचाच फायदा घेत काही अवैध व्यावसायिकांनी तालुक्यात विस्तृत जाळे निर्माण केल्याचे चित्र आहे. गावठी दारूनिर्मिती व विक्रीमुळे सामाजिक आरोग्याला धोका निर्माण होत असून, या अवैध व्यवसायावर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी पोलिस, महसूल प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी संयुक्तपणे पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.