चाकण: खेड तालक्यातील चाकण परिसरात निर्माण झालेल्या गॅसटंचाईमुळे उद्योजक, कामगार आणि लघु व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. गॅस सिलिंडरच्या अभावामुळे अनेक हॉटेल व्यवसाय ठप्प झाले असून, काही ठिकाणी चुलीच्या आधारे हॉटेल्स सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने अनेक हॉटेल्स बंद पडली आहेत, तर जी सुरू आहेत तेथे जेवणाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. परिणामी सामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक ताण पडत आहे. 15 रुपयांना मिळणारा वडापाव आता दुप्पट किमतीत विकला जात असल्याने अन्नाची भांत निर्माण झाली आहे.
दरम्यान, निर्यात ठप्प झाल्याने कांदा उत्पादक शेतकरीही अडचणीत आले आहेत. गॅसटंचाईसोबतच कच्च्या मालाच्या आयातीतील अडथळ्यांमुळे चाकण एमआयडीसीमधील उद्योगांवरही परिणाम झाला असून, उद्योजकांसमोर मनुष्यबळाचा गंभीर प्रश्ननिर्माण झाला आहे. काही कामगारांनी काम सोडून स्थलांतर केल्याचेही समोर येत आहे.
गॅस सिलिंडर मिळत नसल्याने गॅस एजन्सीसमोर नागरिकांची गर्दी वाढत असून, काही ठिकाणी संतापाचे वातावरण आहे. सिलिंडरसाठी खेड तालुक्यात एजन्सीबाहेर रांगा लागत आहेत. नोंदणी असलेल्या ग््रााहकांनाच गॅस सिलिंडर मिळत असल्याने इतरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
अखाती देशांतील युद्धपरिस्थितीमुळे गॅसपुरवठा साखळी विस्कळीत झाली असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर अवैधरीत्या गॅस सिलिंडरवाले एक किलो गॅससाठी 400 ते 500 रुपये आकारत असल्याची माहिती समोर आली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरपुरवठा बंद झाल्याने हॉटेल व्यावसायिक आणि अन्नपदार्थ विक्रेते गंभीर अडचणीत सापडले असून, अनेकांचे स्टॉल बंद पडले आहेत.