चाकण: तब्बल 14 वर्षे असलेल्या शारीरिक संबंधाबाबत पोलिसांत बलात्काराची तक्रार देण्याची धमकी देत 47 वर्षीय महिलेने 27 वर्षीय तरुणाकडे 3 लाख रुपये आणि एक फ्लॅटची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी महिलेवर विविध कलमान्वये उत्तर चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला आणि तरुणात 2012 ते 2026 या काळात शारीरिक संबंध होते. याबाबत बलात्काराची तक्रार करणार नाही, असे म्हणत महिलेने तरुणाकडे पैशाची व सदनिकेची मागणी केली. याप्रकरणी महिलेविरोधात खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 24 जानेवारी 2026 रोजी संबंधित महिलेने चाकण येथील एकतानगर येथील एका हॉटेलमध्ये संबंधित युवकाला व त्यांच्या नातेवाइकांना बोलावून घेतले. त्या ठिकाणी तिने तीन लाख रुपये रक्कम व एका फ्लॅटची मागणी केली.
त्यानंतर युवकाने महिलेला 27 जानेवारी रोजी 99 हजार रुपये मोबाईलवरून पाठवले. तसेच सुमारे 50 हजार रुपये रोख स्वरूपात दिले. तर, उर्वरित रक्कम आठ दिवसांत दिली नाही, तर बलात्काराची केस करेन, अशी धमकी देत पुन्हा पैशांची मागणी केली. याप्रकरणी खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील व्यावसायिक असलेल्या तरुणाने चाकण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पांजरपोळ भोसरी भागात वास्तव्यास असलेल्या या महिलेवर चाकण पोलिसात खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास उत्तर चाकण पोलिस करत आहेत.