Medicine Pudhari
पुणे

Expired Medicines In CGHS Dispensary: सीजीएचएस फुलेनगर डिस्पेन्सरीत एक्सपायर्ड औषधांचा धक्कादायक प्रकार

ज्येष्ठ नागरिकांना मुदत संपलेली औषधे वितरित; अधिकाऱ्यांच्या वक्तव्याने संताप वाढला

पुढारी वृत्तसेवा

येरवडा: येरवड्यातील सीजीएचएस फुलेनगर वेलनेस सेंटर डिस्पेन्सरीमध्ये रुग्णांच्या जिवाशी खेळ चालत असल्याचे दिसून येत आहे. कारण, येथील केंद्रीय सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत उपचारांसाठी येणाऱ्या निवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना चक्क मुदत संपलेली (एक्सपायर्ड) औषधे वितरित करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. याबाबत विचारणा केली असता, ‌‘त्यात काय एवढे? मुदत संपलेल्या औषधामुळे आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. अशा घटना घडतच असतात,‌’ असे मुजोर शब्दात संबंधित अधिकाऱ्याने उत्तर दिल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयपी (खपवळरप झहरीारलेेिशळर) प्रमाणित ही औषधे खासगी मेडिकलमधून डिस्पेन्सरीला सप्लाय केली जातात. रुग्णांनी मागणी केल्यानंतर साधारण तीन दिवसांनी ही औषधे डिस्पेन्सरीमध्ये उपलब्ध होतात. मात्र, या सप्लाय साखळीत आणि डिस्पेन्सरीच्या तपासणीत मोठे गौडबंगाल असल्याचे समोर आले आहे. मुदत संपलेली औषधे थेट रुग्णांच्या हातात पडेपर्यंत येथील प्रशासनाला याचा सुगावा कसा लागला नाही? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

संतप्त नागरिक म्हणतात,‌ ‘उच्चस्तरीय चौकशी करा‌’

‌‘सीजीएचएस‌’च्या या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे औषध घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा आणि जिवाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तत्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

काही रुग्णांना नजरचुकीने ‌‘एक्सपायरी डेट‌’ असलेले ड्रॉप देण्यात आले होते. उपचारासाठी केंद्रावर येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे इतक्या रुग्णांमध्ये एखादी घटना घडते, त्यामुळे हा प्रकार फार गंभीर आहे, असे नाही. मुदत संपलेली औषधे घेतल्याने कुणाचा जीव जात नाही. अशा औषधाने आजारावर म्हणावा तेवढा परिणाम होत नाही.
डॉ. सी. पी. चौधरी, अधिकारी, केंद्रीय सरकार स्वास्थ्य योजना औषधालय
दि. 11 मे रोजी एक व्यक्ती डिस्पेन्सरीमधून औषधे घेऊन गेली. सोमवारी (दि. 25) ती व्यक्ती परत आली. त्या वेळी त्याला तीन ड्रॉपचे पॅकेट्‌‍स देण्यात आले होते. त्यापैकी एका पॅकेटची एक्सपायरी डेट संपली होती. त्यामुळे तो ड्रॉप बदलून देण्यात आला.
महेश सुरखे, वितरक, सीजीएचएस फुलेनगर वेलनेस सेंटर डिस्पेन्सरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT