पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलकडून शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये चारही कॅप फेर्यांची प्रवेशप्रक्रिया कशा प्रकारे राबविण्यात येणार आहे यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे, तसेच उमेदवार त्यांच्या पसंतीच्या उतरत्या क्रमाने संस्था आणि अभ्यासक्रमांच्या जास्तीत जास्त 300 पर्याय भरू शकणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. (Pune Latest News)
सीईटी सेलच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, माहिती पुस्तिकेतील नियम 9 मधील तरतुदीनुसार, उमेदवार त्यांच्या पसंतीच्या उतरत्या क्रमाने संस्था आणि अभ्यासक्रमांची पसंती भरू शकतात. उमेदवाराने त्यांच्या लॉगिनद्वारे अर्ज सादर केल्यानंतर पर्याय अर्ज संबंधित केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या फेरींमध्ये वाटपासाठी विचारात घेतला जाईल.
उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या उतरत्या क्रमाने संस्था आणि अभ्यासक्रमांच्या जास्तीत जास्त 300 पर्याय भरण्याची संधी देण्यात आली आहे.
जर एखाद्या उमेदवाराला त्याच्या पहिल्या पसंतीनुसार जागावाटप केली गेली, तर असे वाटप आपोआप गोठवले जाईल आणि उमेदवारास दिलेल्या मुदतीमध्ये प्रवेश घ्यावा लागेल. असा उमेदवार पुढील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेर्यांमध्ये सहभागी होण्यास पात्र राहणार नाहीत.
जर एखाद्या उमेदवाराला दुसर्या फेरीत त्याच्या पहिल्या तीन पसंतींनुसार जागावाटप केले गेली, तर असे जागावाटप आपोआप गोठवले जाईल आणि उमेदवारास दिलेल्या मुदतीमध्ये प्रवेश घ्यावा लागेल. असा उमेदवार पुढील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या फेर्यांमध्ये सहभागी होण्यास पात्र राहणार नाही.
जर एखाद्या उमेदवाराला तिसर्या फेरीत त्याच्या पहिल्या सहा पसंतीनुसार जागावाटप केली गेली, तर असे जागावाटप आपोआप गोठवले जाईल आणि उमेदवारास दिलेल्या मुदतीमध्ये प्रवेश घ्यावा लागेल, असा उमेदवार पुढील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या फेर्यांमध्ये सहभागी होण्यास पात्र राहणार नाही.
चौथी फेरीमध्ये सहभागी उमेदवारांसाठी चौथी फेरीमध्ये केलेले वाटप अंतिम असेल. चौथी फेरीनंतर उमेदवाराला आणखी कोणताही सुधारणा पर्याय उपलब्ध राहणार नाही.