

पुणे/मंचर : उत्तराखंडमधील धराली गावात मंगळवारी (दि. 5) सकाळी झालेल्या भीषण ढगफुटीमुळे आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील 22 नागरिक अडकले होते. त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकत नव्हता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण असताना सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती उत्तराखंडच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तसेच जिल्हा प्रशासनाने रात्री दिली. (Pune Latest News)
अवसरी खुर्द येथील भैरवनाथ विद्यालयाच्या सन 1990 च्या 10 वीच्या बॅचमधील महिला व पुरुष मित्रमंडळी मिळून हे 22 जण पर्यटनासाठी शुक्रवारी (दि. 1) उत्तराखंडला रवाना झाले होते. गंगोत्री परिसरात ते मुक्कामी होते. मंगळवारी (दि. 5) सकाळी त्यांनी सोशल मीडियावर फोटो व स्टेटस शेअर केले होते. मात्र, त्याच दिवशी दुपारी गंगोत्री व धराली परिसरात भीषणढगफुटी झाली आणि त्यानंतर त्यांच्याशी संपर्क पूर्णतः तुटल्यामुळे त्यांचे नातेवाईक आणि ग्रामस्थ चिंतेत होते.
या सर्व प्रवाशांनी ’हिना तपासणी नाका’ (चेक पोस्ट) ओलांडली असून, ते पुढे सुरक्षित स्थळी पोहोचले असल्याची माहिती आहे. काही प्रवाशांचे मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे त्यांच्याशी थेट संपर्क करता आला नाही, मात्र स्थानिक यंत्रणांमार्फत ते सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. पुणे जिल्हा प्रशासनाशीदेखील उत्तराखंड प्रशासनाचा संपर्क झाला असून, सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. तेथील हवामान सामान्य होत असून, लवकरच या पर्यटकांशी पुन्हा संपर्क होईल, अशी माहिती दिली आहे.