

Sanjay Gandhi Niradhar Yojana Aadhar Card Link
पुणे : जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेच्या सुमारे 12 हजार 166 लाभार्थ्यांना आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नसल्याने त्यांच्या मासिक अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. राज्य सरकारकडून 65 वर्षांखालील निराधार व्यक्ती, घटस्फोटित महिला आणि अपंगांना या योजनेअंतर्गत दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. (Pune Latest News)
या योजनेचा उद्देश गरजू व्यक्तींना आर्थिक मदत देणे हा आहे. सध्या जिल्ह्यात एकूण एक लाख नऊ हजार 189 पात्र लाभार्थी आहेत. मात्र, त्यापैकी 12 हजारांहून अधिक जणांनी आधार कार्ड लिंक न केल्यामुळे त्यांना या मदतीचा लाभ मिळू शकलेला नाही. जिल्हा प्रशासनाने या सर्व लाभार्थ्यांना त्यांचे आधार कार्ड त्वरित लिंक करण्याचे आवाहन केले आहे.
महसूल सप्ताह 2025 अंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ राबविले जात आहे. या अभियानांतर्गत प्रशासनाचे कर्मचारी घरोघरी जाऊन आधार कार्ड लिंक नसलेल्या संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना मदत करीत आहेत.
आधार केंद्रावर जा : सर्वांत आधी जवळच्या आधार केंद्रावर जाऊन तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करा. या प्रक्रियेला साधारणत: तीन दिवस लागतात. त्यानंतर तुमच्या बँक शाखेत जाऊन आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या.
बँक खाते आणि मोबाईल नंबर आधारशी जोडल्यानंतर संबंधित तहसील कार्यालयात जाऊन त्याची माहिती द्या. असे न केल्यास तुम्हाला योजनेचा लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते.
नवीन अर्ज : जर योजनेत नव्याने समाविष्ट व्हायचे असेल, तर तहसील कार्यालयात जाऊन संबंधित कागदपत्रे अर्ज भरू शकता.