पुणे

वडगावमध्ये पारंपरिकसह नव्या ढंगात बैलपोळा साजरा

अमृता चौगुले

वडगाव मावळ : वाजंत्री, बँड, डीजे डॉल्बीसह फटाक्यांची आतषबाजी व भंडार्‍याची उधळण करत वडगाव शहरात शनिवारी बैलांच्या मिरवणुका काढत नव्या ढंगात बैलपोळा साजरा केला. शहरातील शेतकर्‍यांनी आज सकाळपासूनच बैलांना ओढ्या-नाल्यावर आंघोळ घालून त्यांना विविध रंगांनी रंगवण्यासाठी लगबग सुरू होती. बैलांची आकर्षक सजावट करून दुपारी बैलांचे औंक्षण व पुरणपोळीचा नैवेद्यही खाऊ घालण्यात आला. देवस्थानचे उपाध्यक्ष गणेश ढोरे, भास्करराव म्हाळसकर, माजी सरपंच बाळासाहेब ढोरे, विश्वस्त अनंता कुडे, सुभाष जाधव, चंद्रकांत ढोरे, किरण भिलारे आदींच्या हस्ते पूजन करून पारंपरिक बैलपोळा सणाला सुरुवात करण्यात आली.

शहरातील ढोरे, म्हाळसकर, चव्हाण, वायकर, भिलारे, पगडे, वहिले, भेगडे, कुडे, जाधव, पडवळ आदी कुटुंबांनी बैलांना सजवून देवदर्शनासाठी आणले होते. काही बैलगाडा मालक व शौकिनांनी वाजंत्री, डीजे डॉल्बी लावून मिरवणुका काढल्या. या वेळी फटाक्यांची आतषबाजी व भंडार्‍याची मुक्त उधळण करण्यात आली.

जय बजरंग तालीमच्या वतीने शेतकर्‍यांचा सन्मान

येथील जय बजरंग तालीम मंडळ ट्रस्टच्या वतीने बैलपोळ्यानिमित्त बळीराजाचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शेतकरी पुत्रांचा सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तालीम मंडळाचे सचिव उमेश ढोरे, अमित मुसळे, बाळासाहेब तुमकर, संजय दंडेल आदींनी संयोजन केले तर राजेंद्र म्हाळसकर यांनी सूत्रसंचालन केले.

अन् तो बैल वेशीतूनच माघारी फिरला

गावाची वेस मानली जाणार्‍या येथील चावडी चौकात बैलांच्या शिंगांना बांधलेला नारळ तोडण्याचा पारंपरिक खेळ रंगला. आज शाम सुखदेव ढोरे या शेतकर्‍याने आपल्या बैलाला बांधलेला नारळ तोडणार्‍याला 51 हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. त्यामुळे सर्वजण त्यांच्या बैलाची आतुरतेने वाट पाहत होते. परंतु, तो बैल वेशीत येऊन पुन्हा माघारी धावल्याने प्रेक्षकांची निराशा झाली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT