पुणे : भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करून सहकारनगर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह 35 ते 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रवींद्र धंगेकर, नितीन कदम, सचिन देडे, अक्षय माने, साकीब आबाजी, संतोष पंडित, अनिल सातपुते यांच्यासह 35 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस कर्मचारी अभिजित बालगुडे यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धंंगेकर यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध भादंवि कलम 143, 145, 149, 188, महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन 1951 चे कलम 135, लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 126 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात जमावबंदीचा आदेश लागू आहे. रविवारी (दि. 12 मे) रात्री भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करून धंगेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहकारनगर पोलिस ठाणे परिसरात आंदोलन केले. त्या वेळी पोलिस ठाण्याच्या आवारात शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते. धंगेकर यांच्या ठिय्या आंदोलनामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी धंगेकर यांच्यासह 35 ते 40 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहकारनगर पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
हेही वाचा