पुणे

खंडाळा तलावाचे पाणी दूषित करणार्‍या दोघांवर गुन्हा दाखल

अमृता चौगुले

लोणावळा(पुणे) : बेकायदेशीररित्या वराह (डुकर) पालनाचा व्यवसाय करीत खंडाळा तलावातील पाणी तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्यास कारणीभूत असलेल्या दोघांवर लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा नगर परिषदेच्या वतीने आरोग्य निरीक्षकांनी हा गुन्हा दाखल केला आहे. लोणावळा नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक दत्तात्रय सुतार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश रामा माडे व अनिल विजय जाधव (दोघेही रा. नेताजीवाडी, खंडाळा) यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिसरात पसरली दुर्गंधी

1 जानेवारी 2017 पासून 22 जून 2023 दरम्यान हा प्रकार घडला आहे. प्रकाश रामा माडे व अनिल विजय जाधव हे वराह (डुकर) पालनाचा व्यवसाय करत होते. हा व्यवसाय करताना कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता त्यांनी नेताजीवाडी, खंडाळा, ठाकरवाडी या परिसरात वराह मोकळी सोडून दिली होती. परिसरातील हॉटेलमधील उरलेल्या अन्न ते त्यांना टाकत होते. हे अन्न सडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

तसेच, त्यांची विष्टा ही कोणतीही प्रक्रिया न करता नाल्यात सोडत होते. ते पाणी खंडाळा येथील तलावात येऊन मिसळल्याने तलावातील पाणी दूषित होऊन जलचर प्राणी तसेच तलावाशेजारी राहणारे नागरिकांचे आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याचे या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. नेताजीवाडी परिसरात राहणार्‍या नागरिकांमध्ये धोकादायक रोगाचा संसर्ग पसरण्याची शक्यता निर्माण झाल्याने व तलावातील पाणी दूषित केल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मयूर अबनावे हे करत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT