पुणे

Gas Explosion Case : ताथवडे गॅस स्फोटप्रकरणी चौघांवर गुन्हा

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : ताथवडे येथील गॅस स्फोटप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवार (दि. 8) ताथवडे येथील जेएसपीएम कॉलेजजवळ घडली. महिपाल चौधरी (रा. पुनावळे), राहुल कुमार राज देवराम (रा. थेरगाव), मोहम्मद रशीद मोहम्मद नसीम (रा. उत्तर प्रदेश), चंद्रकांत महादेव सपकाळ (रा. ताथवडे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक भारत माने यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिपाल चौधरी आणि आरोपी राहुलकुमार यांनी टँकर चालक मोहम्मद रशीद याच्याशी संगनमत केले. दरम्यान, टँकरमधून प्रोपिलीन गॅसची चोरी करीत असताना अचानक आग लागली. ज्यामुळे सिलिंडरचे मोठे स्फोट झाले. यामध्ये स्कूल बस तसेच इतर वाहनांचे नुकसान झाले आहे.

गॅस रिफिलिंग करताना आग लागून स्फोट होण्याची जाणीव असताना देखील आरोपींनी ही कृती केली. त्यासाठी आरोपी जागामालक चंद्रकांत सपकाळ यांनी नियमितपणे जागा उपलब्ध करून दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटना घडल्यानंतर टँकरचालक पळून गेला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT