पुणे

आयुष अभ्यासक्रमांव्दारेही वैद्यकीय क्षेत्रात करिअर शक्य

अमृता चौगुले

पुणे : ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी पारंपरिक एमबीबीएस, बीडीएससह आयुर्वेद, सिद्ध, युनानी, होमिओपॅथी आदी अभ्यासक्रमांतही करिअरच्या संधी निर्माण झाल्या आहेत. आयुष चिकित्सा प्रणालीअंतर्गत भारतीय चिकित्सा पद्धतींचा समावेश होतो. प्रामुख्याने आयुर्वेद, योग आणि नॅचरोपॅथी, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी या शास्त्रांमधील अभ्यासक्रम आणि संशोधन कार्याचा विकास हे या संघटनेचे मूळ उद्दिष्ट आहे. राज्यातील आयुर्वेद, सिद्ध, युनानी, होमिओपॅथी अभ्यासक्रमांचे प्रवेश ही 'नीट'च्या गुणांच्या आधारे केले जातात. संबंधित अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटीसेलच्या माध्यमातूनच पूर्ण केले जातात.

आयुष म्हणजे आयुर्वेदिक, योगा, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी, युनानी व सिद्धा औषधांचा उपयोग करून देण्यात येणारी वैद्यकीय उपचार पद्धती. आयुष उपचारांतर्गत अ‍ॅलोपॅथी उपचारांना पर्यायी उपचार म्हणून आयुष उपचार पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. आयुष हे आयुर्वेदिकचा एक भाग आहे. वाढत्या आयुष उपचाराच्या पद्धतीतील नवनवीन संशोधन पाहता सरकारने आयुष मंत्रालयही तयार केले आहे. आयुष उपचार शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांत चालू व्हावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

आयुर्वेद म्हणजे काय ?

आयुर्वेदातून मिळालेल्या विविध प्रकारच्या उपचार पद्धतींना पर्यायी औषध म्हणून ओळखले जाते. आयुर्वेदाचा मुख्य भर रोगापासून बचाव आणि संपूर्ण मानवी शरीराच्या आरोग्यदायी सुधारावर आहे. हे एक निर्विवाद सत्य आहे की ही प्रक्रिया वेळ घेणारी आहे आणि बरेचदा परिणाम उशिरा होतो. परंतु आयुर्वेदाचा एक फायदा की त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

होमिओपॅथी म्हणजे काय ?

होमिओपॅथी ही एक पर्यायी औषध प्रणाली आहे, जी जर्मन वैद्य सॅम्युअल हॅनेमन यांनी विकसित केली होती. या प्रकारच्या औषधोपचारात रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास आणि रोगाशी लढण्यास मदत होते. होमिओपॅथिक उपचार ही एक संथ प्रक्रिया आहे.

युनानीची ओळख प्राचीन काळापासून…

युनानी चिकित्सा पद्धती भारतात फार पुरातन काळापासून प्रभावशाली पद्धतीने वापरली जात आहे. भारताला हिची ओळख अरब आणि पर्शिअन लोकांनी अकराव्या शतकाच्या आसपास करून दिली. आज, भारत हा एक प्रमुख देश आहे जेथे युनानी चिकित्सेचा अभ्यास केला जातो. येथे मोठ्या संख्येने युनानी शैक्षणिक, संशोधन आणि आरोग्य संस्था आहेत. युनानी पध्दतीचे मूळ ग्रीसमध्ये आहे. युनानीचा पाया हिप्पोक्रेट्सने तयार केला. या प्रणालीच्या वर्तमान स्वरूपाचे अरबांना श्रेय जाते. कारण, त्यांनी जास्तीतजास्त ग्रीक साहित्य अरेबिकमध्ये परिवर्तित करून जपले आणि आपल्या दैनंदिन औषधोपचारातदेखील याचा समावेश केला.

सिद्ध पद्धती आरोग्य केंद्रित

आयुर्वेद अधिक रोग-केंद्रित आहे, तर सिद्ध अधिक आरोग्य-केंद्रित आणि फक्त कायाकल्पबद्दल आहे. त्यामुळे सिद्ध उपचार पध्दतीत उपलब्ध असलेली विविधता आयुर्वेदासारखी विस्तृत असू शकत नाही. कारण आयुर्वेद प्रत्येक रोगाचा विचार करतो. सिद्ध प्रत्येक रोगाच्या उपचारात प्रवेश करत नाही.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT