जीवन कड
सासवड : सासवड नगरपरिषदेची २०२२-२०२६ पंचवार्षिक निवडणूक काही आठवड्यांवर येऊन ठेपली असून, या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी आपापल्या प्रभागात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यापूर्वीच्या ९ प्रभागांवरून आता ११ प्रभागांत ही निवडणूक होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नवीन प्रभागरचना अद्याप मिळाली नसली तरी अंदाज बांधून इच्छुक तयारीला लागले आहेत.
सासवड ही 'क' वर्ग नगरपरिषद असून पालिकेवर गेली दहा वर्षे माजी आमदार दिवंगत चंदूकाका जगताप आणि आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रणित जनमत विकास आघाडीची सत्ता आहे. मागील निवडणुकीत ९ प्रभागांतून १९ नगरसेवक आणि नगराध्यक्ष तसेच दोन स्वीकृत सदस्य अशी वाढ झाली आहे. तर स्वीकृत सदस्यांची संख्या ३ झाली आहे. सध्या नगरपरिषदेत जनमत विकास आघाडीचे १५ सदस्य आणि नगराध्यक्ष तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी २ सदस्य आणि २ स्वीकृत सदस्य आहेत. एकूण सदस्य संख्येपैकी आरक्षित जागांवर दोन सदस्य आणि नगराध्यक्ष आहेत. नगरपरिषदेची सत्ता आमदार संजय जगताप यांच्याकडे असून आगामी निवडणुकीसाठी त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे.
गत निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येत आघाडी केली होती, तर भाजपा काही जागांवर स्वतंत्र लढली होती. यंदाही आ. संजय जगताप यांच्या नेतृत्वाखालील जनमत विकास आघाडीकडून सर्व जागांवर निवडणूक लढविली जाणार आहे. माजी मंत्री विजय शिवतारे हे लोकमत विकास आघाडी करून पॅनेल उभा करणार आहेत. त्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांना तसे निमंत्रणवजा आवाहन शिवतारे यांनी केले आहे. भाजपा स्वतंत्र पॅनल करून पक्ष चिन्हावर सर्व जागांवर निवडणूक लढविणार आहे. या वेळी जनमतकडून लढण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी असून, काही युवकांनी अपक्ष लढण्याचीही तयारी ठेवली आहे.
गतवेळीप्रमाणे राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याबाबत आताही माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिले आहे. याबाबत अद्याप काहीही हालचाली दिसत नाहीत.
भाजपा गत निवडणुकीप्रमाणे पक्ष चिन्हावर लढणार आहे. मात्र, गत निवडणुकीत जनमत विकास आघाडी वगळता इतरांना सर्व जागांवर उमेदवार उभे करता आले नव्हते.