वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : हवेली तालुक्यात कुणबी जात प्रमाणपत्र (दाखले) देण्यासाठी महसूल विभागाने गावोगाव मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनामुळे कुणबी नोंद शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तालुक्यात 22 हजारांहून अधिक कुणबी नोंदी सापडल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
मोडी लिपीतील नोंदींचे मराठी भाषांतर करून त्या गावोगावच्या तलाठी कार्यालयात लावण्यात आल्या असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी लागणार्या कागदपत्राबाबत मंडल अधिकारी, तलाठी व संबंधित विभागाचे प्रमुख मार्गदर्शन करीत आहेत. सिंहगड भागातील गोर्हे बुद्रुक येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात मराठा समाजाच्या युवकांसह महिलांनी गर्दी केली होती. डोणजे विभागाचे मंडल अधिकारी प्रकाश महाडिक यांनी माहिती दिली. दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाजीराव पारगे, योगेश भामे, सुशांत खिरीड,कालिदास माताळे, तलाठी उमेश देवघडे आदी उपस्थित होते.
खडकवासला, नांदेड येथेही कुणबी दाखल्यांसाठी महसूल विभागाने शिबिराचे आयोजन केले आहे, अशी माहिती मंडल अधिकारी हिंदूराव पोळ यांनी दिली. 'तलाठी कार्यालयात लावण्यात आलेल्या नोंदीची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांसह दाखल्यांसाठी अर्ज दाखल करावे,' असे आवाहन पोळ यांनी केले आहे. खानापूर येथे आयोजित शिबिरात शंभराहून अधिक युवक, मराठा समाजबांधव सहभागी झाले होते. खानापूरचे मंडल अधिकारी गौतम ढेरे यांनी मार्गदर्शन केले. माजी सरपंच शरद जावळकर, नारायण जावळकर, व्यापारी संघटनेचे नंदुकुमार जावळकर, प्रशांत दारवटकर, उमेश थोपटे, सुधाकर गायकवाड आदी उपस्थित होते.
हवेली तालुक्यात 22 हजारांहून अधिक कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मोडी लिपीतील नोंदींचे मराठी भाषांतर करून गावोगावच्या तलाठी कार्यालयात लावण्यात आल्या आहेत. तालुक्यातील 17 मंडल विभागात कुणबी दाखल्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
– किरण सुरवसे, तहसीलदार, हवेली तालुका.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.