पुणे

आता थकबाकीदारांना जाणार करासाठी कॉल; शंभर कर्मचारी केले जाणार नियुक्त

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आर्थिक वर्ष संपण्यास केवळ तीन आठवड्यांचा कालावधी शिल्क राहिल्याने अंदाजपत्रकातील उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने मिळकतधारकांना फोन करण्यासाठी कॉल सेंटर सुरू केले आहे. एका दिवसात दहा हजार फोन कॉलचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, या कॉल सेंटरमध्ये शंभर कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. मिळकतकर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा व महत्त्वाचा स्रोत आहे. महापालिकेच्या 2023-24 च्या अंदाजपत्रकामध्ये आकारणी व कर संकलन विभागाला 2400 कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे.

मात्र, अद्याप 2000 कोटी रुपयेही गोळा होऊ शकलेले नाहीत. त्यातच चालू आर्थिक वर्ष संपण्यास केवळ तीन आठवड्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आता केवळ 25 दिवसच हाती राहिल्याने कर आकारणी व कर संकलन विभागाची धावपळ सुरू झाली आहे. मिळकतकर थकीत असलेल्या मिळकतींची संख्या मोठी असल्याने पालिकेने दीर्घकाळ थकबाकी असलेल्या मिळकती सील करण्यास सुरुवात केली आहे. यातील काही मिळकतींचा लिलावही केला गेला. पुढील टप्प्यातील लिलाव लवकरच केला जाणार आहे.

दरम्यान, या सिलिंगच्या कारवाईसोबतच पालिकेकडून मागील आठवड्यापासून थकबाकीदारांच्या दारात बँड वाजवण्यास सुरुवात केली आहे. काही थकबाकीदार मिळकतकर भरू लागले आहेत. मात्र, थकबाकीची रक्कम मोठी असल्याने तसेच आर्थिक वर्षाच्या शेवटचा महिना असल्याने महापालिकेने प्रत्येक थकबाकीदाराला फोन करण्याचा निर्णय घेतला आहे. या कॉल सेंटरमधील कर्मचार्‍यांद्वारे मिळकतकराच्या थकबाकी वसुलीसाठी आता थेट फोन केले जाणार आहेत. तूर्तास पालिकेच्या व्हॉट्सअप क्रमांक व कॉल सेंटर हाताळणारे कर्मचारीच मिळकत करासंदर्भातील फोन करत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT