वासराचे शौर्य! सिंहगड पायथ्याशी बिबट्याचा हल्ला परतवला Pudhari
पुणे

Leopard Attack: वासराचे शौर्य! सिंहगड पायथ्याशी बिबट्याचा हल्ला परतवला

खरमरीतील फार्महाऊस परिसरात मध्यरात्रीची घटना सीसीटीव्हीत कैद; नागरिक व पर्यटकांत दहशत

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला: सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला खरमरी (ता. हवेली) येथे फार्महाऊसमध्ये शिकारीसाठी शिरलेल्या बिबट्याशी अवघ्या चार महिन्याच्या वासराने झुंज देत बिबट्याचा हल्ला परतवून लावला. वासराचा आक्रमक पवित्रा पाहून बिबट्याने माघार घेत जंगलात पळ काढला. गुरुवारी (दि. 23) मध्यरात्री घडलेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात चित्रीत झाला आहे. (Latest Pune News)

सिंहगड किल्ल्याच्या परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बिबटे सिंहगडच्या जंगलातून थेट लोकवस्त्या, गावात शिरत असल्याने स्थानिक रहिवाशांसह पर्यटकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्य खानापूर - पाबे घाटरस्त्यावरील खरमरी येथील एका मंदिराजवळ असलेल्या बी. एस. पतंगे यांच्या फार्महाऊसमध्ये पाहरेकरी म्हणून सोपान साळुंखे काम करतात, त्यांच्याकडे जनावरे आहेत.

नेहमीप्रमाणे गाई-वासरांना चारा टाकून रात्री दहा वाजता साळुंखे हे झोपले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास एक धष्टपुष्ट बिबट्या फार्महाऊसमध्ये शिरला. हळूवारपणे येत बिबट्याने वासरावर झडप घातली. त्यावेळी वासराने गळ्यातील दाव्यासह बिबट्यावर झेप घेतली. त्यामुळे चिडलेल्या बिबट्याने जोरदार डरकाळी फोडत चवताळून वासरावर झडप घातली. मात्र बिबट्याची झडप चुकवून वासराने बिबट्याला धडक दिली. वासराचा आक्रमक पवित्रा पाहून बिबट्याने माघार घेतली.

वासरू आणि बिबट्याचा आवाज ऐकून साळुंखे गोठ्यात आले. त्यावेळी बिबट्या वासराजवळ उभा असल्याचे दिसले. त्यांनी काठी आपटत आरडाओरडा केला, त्यानंतर बिबट्याने जंगलाकडे पलायन केले. हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती किसनराव जोरी म्हणाले, ‌‘बिबटे आक्रमक झाले आहेत. नागरी वस्त्यांत बिबट्यांचा वावर वाढल्याने मनुष्यहानी होण्याचा धोका आहे. त्यामुळे वन विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात.‌’

सिंहगड किल्ल्याच्या चोहोबाजूंच्या जंगलात पाच सहा बिबट्यांचे वास्तव्य आहे. गेल्या महिनाभरात पाच-सहा वेळा बिबटे नागरी वस्त्यांत शिरल्याचे प्रकार घडले आहेत. बिबट्यासह वन्यजीवांचे अधिवास क्षेत्र असल्याने स्थानिक रहिवाशांनी खबरदारी घ्यावी.
समाधान पाटील, वन परिमंडळ अधिकारी, सिंहगड वन विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT