पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये गेल्या आठवड्या इतकीच रविवारी फळभाज्यांची आवक झाली. मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने कोबी व बटाट्याच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली.
रविवारी तरकारी विभागात 90 ट्रकमधून शेतमालाची आवक झाली. स्थानिक भागासह परराज्यातून बाजारात कोबीची आवक होते. स्थानिक परिसरातून कोबीची अपेक्षित आवक होत नाही.
त्यात परराज्यातून होणार्या आवकेत मोठी घट झाल्याने कोबीच्या दरात वाढ झाली. तर, शीतगृहातून कमी प्रमाणात बटाटा बाजारात आल्याने दरात वाढ झाल्याचे सांगण्यात आले. टोमॅटोला सातत्याने मिळणार्या कमी दरामुळे शेतकर्यांनी काढलेली पिके त्यात पाण्याअभावी नवीन लागवडी न झाल्याने टोमॅटोच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी, मार्केट यार्डात टोमॅटोची घटलेली आवक कायम आहे. कांद्याला कमी दर मिळत असल्याने शेतकरी वर्गाने कांदा साठवणुकीस प्राधान्य दिले आहे.
परिणामी, गत आठवड्याच्या तुलनेत कांद्याची आवक टिकून असल्याचे सांगण्यात आले. परराज्यांतून आलेल्या शेतमालामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून सुमारे 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, हिमाचल प्रदेश येथून 2 ट्रक मटार, आंध्रप्रदेश व तामिळनाडू येथून 4 ते 5 टेम्पो शेवगा, कर्नाटक येथून 5 ते 6 टेम्पो तोतापुरी कैरी व 2 टेम्पो घेवडा तर गुजरात, मध्य प्रदेशातून लसणाची 14 ते 15 ट्रक इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून सातारी आले सुमारे 800 ते 900 पोती, टोमॅटो 6 हजार 500 क्रेटस, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, भुईमूग 50 ते 60 गोणी, गाजर 5 ते 6 टेम्पो, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, कांदा 60 ट्रक यांसह आग्रा, इंदूर आणि आग्रा व स्थानिक भागांतून बटाटा 35 ट्रक इतकी आवक झाली.
अतिउष्णतेमुळे पाण्याचा निर्माण झालेला तुटवडा तर काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या तडाख्याने कोथिंबीर, मेथीसह अन्य पालेभाज्यांच्या उत्पादनासह दर्जावर परिणाम झाला आहे. बाजारात पालेभाज्यांची आवक घटली असून दर्जेदार मालाचे प्रमाण कमी आहे. त्यातुलनेत मागणी जास्त असल्याने पालेभाज्यांच्या जुडीचे भाव तीस ते चाळीस रुपयांवर पोहोचले आहेत.
रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीची 1 लाख 50 हजार जुडी व मेथीची 50 हजार जुडी आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीरीची आवक स्थिर राहिली तर मेथीची आवक 10 हजार जुड्यांनी वाढली.