पुणे

जुन्नर तालुक्यात व्यवसाय डबघाईला, पाऊसच देतोय हुलकावण्या; बळीराजा चिंताग्रस्त

अमृता चौगुले

ओतूर (पुणे) : पुढारी वृत्तसेवा: जुन्नर तालुक्यात नैसर्गिकरीत्या अवतरलेली अनेक पर्यटनस्थळे आहेत. हजारो पर्यटक पावसाळ्यात या पर्यटनस्थळांना भेट देत असतात. मात्र, यंदा रिमझिम पाऊस वगळता पाऊस हुलकावण्या देत आहे, परिणामी, शेतकरी वर्गदेखील चिंताग्रस्त झाला असून, पर्यटनस्थळांकडे पर्यटकांनी पाठ फिरविली आहे.

यंदा पाऊस हुलकावण्या देत आहे. परिणामी, येथील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडून उपासमारीची वेळ आली आहे. डोंगरदर्‍यातील वेगाने नष्ट झालेली हिरवाई, पिण्याच्या पाण्याचे आटलेले नैसर्गिक स्रोत आदी प्रमुख कारणे पर्यटकांना घरातच थांबण्यास प्रवृत्त करीत असावीत. शेतकर्‍यांना पावसाविना शेतात पेरणी करता येत नाही. माळशेज पट्ट्यात गावागावांमधून विहिरींनी तळ गाठला असून, सर्वचजण दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

जुन्नर तालुक्यात शिवनेरी, लेण्याद्री, ओझर (गणपतीचे), हरिश्चंद्रगड, नाणेघाट, माळशेज घाट, पिंपळगाव जोगा धरण परिसर, वडज धरण आदी स्थळे आज केवळ पावसाअभावी ओस पडली आहेत. परिणामी, पर्यटनस्थळाजवळ असलेले सर्व व्यवसाय डबघाईला आलेले आहेत. त्यात प्रामुख्याने फार्म हाऊस, हॉटेल, लॉजिंग बोर्डिंग, रसवंती गृह, आईस्क्रीम पार्लर, कॉर्नफ्लावर विक्री, खेळणी विक्रेते यांच्यावर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. या भागात सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहात आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस झाला नाही तर शेतीसह विविध व्यावसायांत काम करण्यार्‍या कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळणार आहे.

जूनच्या 15 तारखेपर्यंत पाऊस येणे सर्वांनाच अपेक्षित होते, तसेच यंदा वेळेत पाऊस पडेल, असे जाणकार लोक सांगत होते. मात्र, जूनची 25 तारीख उजाडली तरी पाऊस आलेला नाही. याचा सर्वच व्यवसायांवर परिणाम होऊन ग्रामीण भागातील आर्थिक घडी विस्कटली आहे.
– नितीन पन्हाळे, अध्यक्ष, ओतूर किराणा व्यापारी असोसिएशन

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT