पुणे

बसथांबे.. असून अडचण; नसून खोळंबा : रखरखत्या उन्हामुळे प्रवाशांचे हाल

Laxman Dhenge

कोंढवा : हडपसरपासून कात्रजपर्यंत अनेक ठिकाणी बसथांब्यावर बसशेड नाहीत. जे आहेत त्याचा प्रवाशांना कोणताही फायदा होताना दिसत नाही. मात्र, त्यावरील जाहिराती मात्र ठळकपणे दिसताहेत. उन्ह, वारा, पावसात ताटकळत बसची वाट पाहणार्‍या आबालवृद्ध प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका प्रशासन डोळेझाक करत असल्याचे यातून दिसून येत आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी बसथांबेच नसल्यामुळे, नवख्या प्रवाशांची दिशाभूल होत आहे. त्यामुळे बसथांबे असून अडचण, नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे.
हडपसर-कात्रज या मार्गावरील काही बसथांब्यांची (शेड) दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी बसथांबेच नाहीत.

यामुळे प्रवाशांना रणरणत्या उन्हात बसची वाट पाहावी लागत आहे. काही ठिकाणी स्टीलचे बसथांबे पाहायला मिळतात. मात्र, त्याचा कसलाही उपयोग प्रवाशांना होताना दिसत नाही. बसण्यासाठी अवघी सहा इंच रुंदीची लांबलचक पट्टी, चार गोलकार पाइपवर उभा असलेला बसथांबा ना उन्हापासून, ना वार्‍यापासून, ना पाऊस किंवा थंडीपासून प्रवाशांना सुरक्षित ठेवू शकत नाही. बसथांबा आहे का, तर आहे. पण विचार केला तर त्याचा कसलाही उपयोग बस प्रवाशांना होताना दिसत नाही. मात्र, बसथांब्यासाठी उभ्या केलेल्या चार पाइपवर अर्ध गोलाकार पद्धतीने बसविण्यात आलेल्या पाइपमुळे, जाहिराती लावण्यासाठी दर्शनी बाजूची खूप उत्तम सोय केल्यामुळे, त्या उठून दिसत आहेत. शिवाय, जाहिरात लावणारा सुरक्षितरीत्या चढू- उतरू शकतो, याची काळजी महापालिका पीएमपीएमएल प्रशासनाने घेतल्याचे सहज आणि चटकन लक्षात येते.

कोंढवा मुख्य बसथांबा सोडला, तर अगदी जगताप चौकापर्यंत काही ठिकाणी दुरवस्था झालेले बसथांबे तर, अनेक ठिकाणी बसथांबेच नाहीत. काही वर्षांपूर्वी येथे बसथांबे होते, पण दुरुस्तीच्या नावाखाली काढलेले ते परत बसविलेच नाहीत. सध्या पारा 40 अंशांच्या घरात आहे. असहय्य उखाड्यामुळे अनेक नागरिक घर सोडत नाहीत. पण, हातावरचे पोट असणार्‍या सर्वसामान्य नागरिकाला बाहेर जावेच लागते. स्मार्ट सिटी म्हणून जाहिरात करणार्‍या लोकांनी किमान एकदा तरी या दिवसात भरदुपारी बसने प्रवास करावा. सर्वसामान्य प्रवाशांच्या व्यथा आपोआप समजतील व त्या आपण समजून घ्याल, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही बसथांबे उत्तम प्रकारचे लावतो. एखाद्या ठिकाणी गळती अथवा छत फाटले असेल आणि ते आम्हाला समजले, तर त्याचे काम तातडीने केले जाते. सध्या बसथांबे शिल्लक नाहीत. मात्र, ज्या ठिकाणी नाहीत त्या ठिकाणी पाट्या लावून घेतल्या जातील. लवकरच बसथांबे बसविले जातील.

– डी. एम. तुळपुळे, मुख्य स्थापत्य अभियंता, पीएमपीएमएल

पुण्यातील बससेवा म्हणजे रामभरोसे, रस्त्यात बस कधी बंद पडेल हे सांगता येत नाही. बसथांब्यांचे म्हणाल, तर गेली 15 मिनिटे बसची वाट रखरखत्या उन्हात पाहतोय. येथे ना बसथांबा आहे, ना एखादा बोर्ड. कुठे जायचे, कोणती बस पकडायची माहीत नाही. तुम्हालाच विचारतो, कात्रजला जायचं आहे, किती नंबरची बस पकडू…?

– श्रीपाद जोशी, नवखा बस प्रवासी

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT