पुणे

पिंपरी: महापालिका-स्मार्ट सिटीच्या वादात रखडला बसशेड

अमृता चौगुले

सांगवी (पुणे) : नवी सांगवी येथील कृष्णा चौकातील पीएमपी बसशेड दोन वर्षे होत आली तरी उभारला गेला नाही. महापालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या वादामुळे तब्बल गेली दोन वर्षे येथील बसशेड उभारला जात नसल्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.

बसशेड महापालिकेने उभारायचा, की स्मार्ट सिटीने? यातच दोन वर्षे संबंधित अधिकार्‍यांनी घालवली. मात्र, यांच्या वादामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता असतानादेखील प्रवाशी रस्त्यावर उभे राहून पीएमपी बसची वाट पाहत होते. आता पावसाळा सुरू झाला आहे. पाऊस असल्यावर छत्रीच्या आसर्‍याने बसची वाट पाहत प्रवाशांना उभे रहावे लागत आहे.

बसशेड निर्माण करण्याची मागणी

एकीकडे खासगी हॉस्पिटलचे सुरक्षारक्षक इथे थांबू नका, तिथे थांबू नका, बाहेर रस्त्यावर, पदपथावर थांबले तर रिक्षाचालक, पायी चालणारे नागरिक, वाहने यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इथे पीएमपी बसथांबा आहे. मात्र, बसशेड नसल्यामुळे नेमके उभे राहायचे तरी कुठे? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर बसशेड निर्माण करण्याची मागणी
केली आहे.

अनेकदा लोकप्रतिनिधींकडे बसशेड उभारण्याबाबत विनंती केली. मात्र, बघतो, करतो, अशी उत्तरे मिळाली. मी दररोज कॉलेजला जात असते. उन्हाळा कसा तरी काढला. आता मात्र पावसाळ्यात खूपच हाल होणार आहेत. संबंधित अधिकार्‍यांनी प्रवाशांची समस्या त्वरित सोडवावी.
– श्रृती दीक्षित, स्थानिक रहिवासी

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT