Budhwar Peth Police Raid Pudhari
पुणे

Budhwar Peth Combing Operation Controversy: बुधवार पेठ कोम्बिंग ऑपरेशनवर मानवाधिकारांचा सवाल; आयोगाकडे तक्रार

ग्राहकांना सार्वजनिकरीत्या बसवून अपमान केल्याचा आरोप; अनैतिक मानवी व्यापार व अमली पदार्थ प्रकरणात तीन गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: बुधवार पेठ परिसरात पुणे पोलिसांनी केलेल्या 10 तासांच्या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान ग््रााहकांना रस्त्यावर बसवून सार्वजनिकरीत्या अपमानित केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याप्रकरणी तुषार देविदास झेंडे पाटील यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार झालेल्या या कारवाईत काही अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली. दोन बांगलादेशी महिलांना बेकायदेशीर वास्तव्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले, तर एका व्यक्तीकडून अमलीपदार्थ जप्त करण्यात आले. संबंधित बाबींवर कायदेशीर कारवाई करणे योग्य असले तरी कारवाईदरम्यान उपस्थित ग््रााहकांशी वागण्याची पद्धत अमानवी असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

झेंडे पाटील यांनी म्हटले आहे की, अनेक ग््रााहकांना कोणताही गुन्हा तत्काळ दाखल नसताना तासन्तास रस्त्यावर बसविण्यात आले. त्यांची सार्वजनिक ठिकाणी ओळख उघड होईल अशा पद्धतीने वागणूक दिल्याने त्यांच्या सन्मानाला धक्का बसला. ही वागणूक मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचा दावा त्यांनी तक्रारीत केला आहे. तक्रारदाराने आयोगाकडे या संपूर्ण कारवाईची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पुणे पोलीस आयुक्तांकडून सविस्तर अहवाल मागवावा, ऑपरेशनदरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज, लॉगबुक आणि ताबा नोंदी तपासाव्यात, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, ज्या व्यक्तींना अपमानास्पद वागणूक देण्यात आली, त्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत शिफारस करावी, असेही नमूद करण्यात आले आहे. भविष्यात अशा प्रकारच्या कारवायांमध्ये मानवी सन्मान अबाधित राहील. यासाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी करण्याचीही विनंती आयोगाला करण्यात आली आहे.

पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान महिलांकडून वेश्या व्यावसाय करून घेतल्याप्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणातही गुन्हा दाखल केला आहे. या कोम्बिंग ऑपरेशन कारवाईत आतापर्यंत तीन गुन्हे दाखल केले आहेत. पहिल्या गुन्ह्यात महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केले. तसेच महिलांना कुंटणखाण्यात ठेवून वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईवर आपली उपजिका भागवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रणजित आणि त्याच्या साथीदारावर पोलिस निरीक्षक छगन कापसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कायदा (पीटा) नुसार गुन्हा दाखल केला आहे. बुधवार पेठेतील सपना बिल्डींग येथे कोम्बिंग ऑपरेशनद्वारे कारवाई केल्यानंतर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

26 वर्षीय तरुणीला पैशांचे आमिष दाखवून तिला कुंटणखाण्यात ठेवून वेश्या व्यवसाय करून घेतल्याप्रकरणात राजन, मुल्ला, शांताबाई, जोहरूद्दीन शेख आणि रेश्मा नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस निरीक्षक कांचन मोहन जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे.

बुधवार पेठेतील माचिस बिल्डिंग येथे ही कारवाई केली आहे. दरम्यान, पेठेतील चेतक हॉटेल समोरील सार्वजनिक रस्त्यावर चरस बाळगल्याप्रकरणात पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. रामेश्वर विभीषण बिराजदार (वय 31, रा. गणजरा हॉटेलच्या पार्किंगमधील खोलीत, बाजीराव रोड, मूळ रा. लातूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस शिपाई सुमित खुट्टे यांनी फिर्याद दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT