पुणे

अर्थसंकल्पात पुण्याला झुकते माप : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निधींचा पाऊस

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. पुण्याला झुकते माप देताना त्यातील अनेक योजना मात्र यापूर्वीच जाहीर झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प विधिमंडळात मंगळवारी सादर केला. पायाभूत सुविधा प्रकल्प आणि त्यांचे भूसंपादन, नागपूरच्या धर्तीवर पुण्यात एम्ससह परिचर्या महाविद्यालय, डे केअर केमोथेरपी सेंटर आणि पर्यटनस्थळासाठी भरपूर निधी दिला आहे.

रिंगरोडच्या भूसंपादनासाठी तब्बल 10 हजार 519 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. पुणे-नाशिक या नवीन रेल्वे मार्गांचे भूसंपादन सुरू असल्याचा केवळ उल्लेख अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. तसेच पुणे-लोणावळा मार्गिका तीन आणि चार या रेल्वे मार्गांकरिता येणार्‍या खर्चात 50 टक्के आर्थिक सहभाग राज्य सरकारचा असणार आहे. बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. नागपूर एम्सच्या धर्तीवर औंध येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था उभारण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यात 15 खाटांचे अद्ययावत डे केअर केमोथेरपी सेंटर, तर लोणावळ्यातील जागतिक दर्जाचा स्कायवॉक प्रकल्प – 333 कोटी 56 लाख रुपये खर्चून उभारण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर आणि शिरूर तालुक्यातील समाधी स्थळ वढू बुद्रुक येथील स्मारक 270 कोटी रुपयांचा आराखडा असून त्याचे काम सुरू असल्याचे म्हटले आहे. एकवीरादेवी मंदिर जिल्हा पुणे तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणांची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय संगमवाडी, पुणे येथे लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक, तर हुतात्मा श्री शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकासासाठी 102 कोटी 48 लाख रुपयांचा आराखडा असणार आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT