बेळगावात उभारणार मराठी भाषा उपकेंद्र

बेळगावात उभारणार मराठी भाषा उपकेंद्र

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मराठी भाषा गौरवदिनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात याचा संदर्भ देत कविता, चारोळ्यांतून विरोधकांना चिमटे काढले. तसेच दिल्ली आणि गोव्याच्या धर्तीवर बेळगावात मराठी भाषा उपकेंद्र सुरू करण्याची घोषणा केली.

अजित पवार यांनी कवी कुसुमाग्रजांना अभिवादन करत अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात केली. कुसुमाग्रजांचा आज जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. कोलंबसाचे गर्वगीत, वेडात दौडले वीर मराठे सात, क्रांतीचा जयजयकार, स्वातंत्र्यदेवतेची विनवणी यासारख्या अजरामर कवितांमधून मराठी मनाचे स्फुल्लिंग चेतविल्याचे पवार म्हणाले. यावेळी त्यांनी 'कोटी कोटी असतील शरीरे, मनगट अमुचे एक असे कोटी कोटी देहांत, आज एक मनीषा जागतसे एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो राहील रण धगधगते' या कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्तीही उद्धृत केल्या.

उगाच टीका करू नका

अर्थसंकल्पीय भाषणाच्या समारोपावेळीही अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ती म्हटल्या. शिवाय त्या काव्यपंक्तीतून विरोधकांना टोलाही लगावला. अजित पवार म्हणाले की, हा अर्थसंकल्प मांडून झाल्यानंतर प्रथेप्रमाणे विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येतील. त्या ठरलेल्याच असतात, हेही आपल्या सगळ्यांना माहीत आहे. कुसुमाग्रजांच्याच शब्दात सांगायचे तर, 'प्रकाश पेरा आपुल्या भोवती, दिव्याने दिवा पेटतसे; इथे भ्रष्टता तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका, भलेपणाचे कार्य उगवता, भलेपणाचे कार्य उगवता उगाच टीका करू नका', असा चिमटा अजित पवारांनी काढला तेव्हा सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी त्यांना चांगलीच दाद दिली.

मराठी भाषेसाठी अर्थसंकल्पातील तरतुदी

महाराष्ट्राबाहेर मराठी भाषेचे संवर्धन करणार्‍या मराठी मंडळांना अनुदान.
गोवा व दिल्लीप्रमाणेच बेळगावात मराठी भाषा उपकेंद्र स्थापन केले जाईल. त्याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल.
रिद्धपूर, जिल्हा अमरावती येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापण्यास मान्यता.
'मंगेश पाडगावकर कवितेचे गाव' हा उपक्रम वेंगुर्ला (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे राबविण्यात येणार असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
मुंबईतील गिरगाव येथे मराठी भाषा भवनाचे काम कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात येणार.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news