पुणे: भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) स्वातंत्र्य दिनाच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध योजना सुरू करत आहे. पुणे शहरात कनेक्टिव्हिटी चांगली देण्यासाठी ७०० टॉवर्स अपग्रेड करण्यात येणार आहेत. नेटवर्क नसतानाही खास आपत्कालीन सेवांसाठी तयार केलेला सॅटेलाईट मोबाईल नुकताच लाँच केला आहे.
पुणे बीएसएनएलचे महाव्यस्थापक (मोबाईल) अतुल वाखले यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्याला यंदा ७९ वर्षे पूर्ण होऊन पुढील वर्षी ८० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने देशातील नागरिकांसाठी विविध योजना देण्यात येणार आहेत.
सुमारे १ लाख ३४ हजार १६६ रुपये किमतीचा सॅटेलाईट मोबाईल लाँच झाला आहे. मात्र, तो विशिष्ट व्यक्तींसाठी आहे. जसे देशाच्या सीमेवर रक्षण करणारे सैनिक, आपत्कालीन परिस्थितीत काम करणाऱ्या संस्था, संघटना आणि कार्यालये यांच्यासाठी आहे.
फाईव्ह जी यंत्रणा करताहेत सक्षम
बीएसएनएल सध्या फोरजी यंत्रणा सक्षम करत आहे. यात टीसीएस, सी.डॉट. तेजस यासारख्या कंपनी साहाय्य करत आहेत. देशभरात सुमारे १ लाख टॉवरचे अपग्रेडेशन केले जाणार आहे. यात पुणे शहरातील ७०० टॉवरचा समावेश आहे. ग्रामीण भागातील १०३ टॉवरचा त्यात समावेश आहे.
सॅटेलाईट मोबाईल नेमका कुणासाठी?
कुठलेही नेटवर्क नसताना चालणारा बीएसएनएलचा सॅटेलाईट मोबाईल यानिमित्ताने लाँच केला आहे. मात्र, हा मोबाईल सर्वसामान्यांसाठी नसून आपत्कालीन सेवा देणाऱ्या संस्था, गिर्यारोहण करणाऱ्या संस्था, समुद्रात काम करणारे कोळी बांधव, जहाज कंपन्या, दुर्गम भागात जाणाऱ्या पर्यटक यंत्रणा, इव्हेंट कंपनी, सुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन यंत्रणा, शासनाच्या विशेष आपत्कालीन यंत्रणा यांनाच तो दिला जाणार आहे.