पुणे: हॉर्न वाजवल्याच्या कारणातून झालेल्या वादात टोळक्याने भाऊ-बहिणीला बेदम मारहाण केल्याची घटना भवानी पेठेतील गुरुनानकनगर परिसरात घडली. टोळक्याने तरुणाच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत तीन जण जखमी झाले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मारहाणीत करण ललित केसवाणी (वय 28), भाऊ हर्ष आणि बहीण निकिता हे जखमी झाले आहेत. टोळक्याने करण यांचे आजोबा भारत यांना शिवीगाळ करून त्यांचे घर जाळून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी शोएब उमर सय्यद (रा. कासेवाडी, भवानी पेठ) याच्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, शोएब याला अटक केली आहे.
याबाबत करण केसवाणी यांनी फिर्याद दिली आहे. करण यांचा भाऊ हर्ष शनिवारी (दि. 27 एप्रिल) भवानी पेठेतील गुरुनानकनगर परिसरातून निघाला होता. त्या वेळी मोटारीचा हॉर्न वाजवल्याने आरोपी शोएबसोबत त्याचा वाद झाला. आरोपींनी हर्षच्या जीवनज्योती सोसायटी समोर हर्ष यांना बेदम मारहाण केली. सोडवण्यास गेलेल्या करण, त्याची बहीण निकिता, आजोबा भारत यांना शिवीगाळ करून धमकी दिली.