पुणे: पुरंदर विमानतळामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार असून, विमानतळ करायचे झाल्यास सरकारला आमच्या प्रेतावरून जावे लागेल, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश, सामाजिक कार्यकर्ते व शेतकर्यांचे नेते बी. जी. कोळसे पाटील यांनी सोमवारी येथे दिला.
प्रस्तावित पुरंदर विमानतळाला विरोध करण्यासाठी सात गावांतील हजारो शेतकर्यांनी सोमवारी भर तळपत्या उन्हात अल्पबचत भवनापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढून आपला निर्धार व्यक्त केला.
‘जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची’, अशा घोषणा देत निघालेल्या या मोर्चात पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, खानवडी आणि पारगाव या सात गावांतील रहिवासी सहभागी झाले होते. विमानतळासाठी या गावांतील 2673 हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. मोर्चात आलेल्या आंदोलनकर्त्यांनी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना याबाबतचे निवेदन दिले.
शेतकरी विमानतळासाठी एक इंचही जमीन देणार नाहीत, असा निर्धार व्यक्त करून कोळसे पाटील म्हणाले की, विमानतळासाठी सरकारकडे इतरही अनेक पर्याय आहेत, त्यांचा विचार व्हावा. परंतु, सध्याच्या ठिकाणी विमानतळ केल्यास शेतकर्यांनी पै-पै करून उभे केलेले शेतकर्यांचे संसार मोडतील.
दूरवरून पाणी आणून मोठ्या कष्टाने उभी केलेली येथील गावकुसे या निर्णयाने बरबाद होणार असून, ते आम्ही होऊ देणार नाही.सरकार जबरदस्तीने विमानतळ लादत आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, ज्यांच्यासाठी विमानतळ बांधण्यात येत आहे, त्यांनी काय त्याग केले आहेत.
देशाच्या 73व्या घटनादुरुस्तीने ग्रामपंचायत आणि ग्रामसभेला याबाबतचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार येथील सातही गावांतील ग्रामपंचायतींनी विमानतळाला विरोध असल्याचे ठराव मंजूर केले आहेत. मात्र, सरकार त्याचा विचार करत नाही. हा ग्रामस्थांवर अन्याय असून, त्यामुळे पुढील पिढ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
शेतकरी मानसिक दबावाखाली
शेतकरी मानसिक दबावाखाली असून, येथे सुरू केलेले ड्रोन सर्वेक्षण आणि जमीन मोजणी ताबडतोब थांबवावी, अन्यथा शेतकरी आत्मसमर्पण करून जीवन थांबवतील. मोबदला म्हणून फक्त पैसा देण्याचा विचार शासन करते. मात्र, शेतकर्यांच्या जीविताचा विचार करत नाही. जनतेचे जीवन सुसह्य करण्याऐवजी त्यांना पिडा देण्याचे काम शासन करत आहे. त्याला वाचा फुटावी म्हणून हा जनआक्रोश मोर्चा काढल्याचे एखतपूर- मुंजवडीतील ग्रामपंचायतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पुरंदर तालुका नष्ट करण्याचेच हे कट-कारस्थान आहे. त्याने आमचे अस्तित्वच नष्ट होणार आहे. त्यामुळे शेतकर्यांनी सतर्क राहून विमानतळाचे हे भूत लाथाडून लावायचे आहे. जमिनींच्या बदल्यात केवळ पैसे देऊन भागणार नाही, तर आमच्या अस्तित्वाचा विचारही व्हायला हवा.
मनीषा गायकवाड, सरपंच, कुंभारवळण