स्तनपानामुळे वजन कमी होण्यास मदत; वैज्ञानिक संशोधनातील निष्कर्ष Pudhari
पुणे

Breastfeeding Benefits: स्तनपानामुळे वजन कमी होण्यास मदत; वैज्ञानिक संशोधनातील निष्कर्ष

स्तनपान सप्ताहाला आजपासून प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

Breastfeeding helps weight loss

पुणे: नवमातांसाठी स्तनपान केवळ बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर नाही, तर त्यांना गरोदरपणानंतरचे वजन कमी करण्यासही मदत करू शकते, असे अलीकडील वैज्ञानिक संशोधनातून स्पष्ट झाले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधनानुसार, ज्या मातांनी सहा महिन्यांहून अधिक कालावधीसाठी स्तनपान केले, त्यांचे वजन जलदगतीने कमी झाल्याचे आढळून आले. त्याचबरोबर त्यांच्या चयापचय प्रक्रियेत सकारात्मक बदल झाले.

स्तनपानाचे आरोग्यदायी फायदे समजावून सांगणे, आईसोबत बाळालाही स्तनपानाचा फायदा होतो याबाबत जनजागृती करणे यासाठी 1 ते 7 ऑगस्टदरम्यान स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. आईचे दूध बाळासाठी पूर्णान्न असते. यामुळे बाळाचा सर्वांगीण विकास होतो. आईचे दूध बाळाला पचायला सोपे असते. बाळ किमान सहा महिन्यांचे होईपर्यंत बाळाला आईच्या दूधाशिवाय काही देऊ नये, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ डॉ. स्मिता सांगडे यांनी दिला आहे.  (Latest Pune News)

स्तनपानादरम्यान शरीर अधिक उष्मांक (कॅलरीज) खर्च करते. एका अभ्यासानुसार स्तनपान करताना दररोज सुमारे 500 कॅलरीज अधिक खर्च होतात. त्यामुळे गर्भधारणेपूर्वीचे वजन लवकर प्राप्त करण्यात स्तनपान मदत करू शकते. याशिवाय, हार्मोन्समध्ये होणारे बदल आणि गर्भाशयाचे नैसर्गिकरित्या पूर्वस्थितीत येणे या प्रक्रियेतही स्तनपान सहाय्यक ठरते. जागतिक आरोग्य संघटनेसह विविध आरोग्य संस्थांनी स्तनपानाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे फायदे अधोरेखित केले आहेत.

स्तनपानामुळे स्नायूंना व्यायामासारखा लाभ मिळतो. विशेषतः पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. काही मातांसाठी ही नैसर्गिक प्रक्रिया व्यायामापेक्षा प्रभावी ठरते, असेही आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे आहे. तथापि, केवळ स्तनपानावर भर न देता संतुलित आहार, पुरेशी झोप आणि हलका व्यायामही महत्त्वाचा असतो.

स्तनपान हे नवजात बाळासाठी अमूल्य असून, मातेसाठी वजन कमी करण्याचा एक सुरक्षित आणि नैसर्गिक मार्ग आहे. मात्र वजन कमी होण्याचा वेग प्रत्येक महिलेसाठी वेगवेगळा असतो. स्तनपानाचा हा अतिरिक्त आरोग्य लाभ पाहता, मातांनी शक्य तितक्या काळ बाळाला स्तनपान देणे हे त्यांच्या स्वतःच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.
- डॉ. शीतल पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ
आईचे गरोदरपणात वाढलेले वजन कमी होते. गर्भाशय लवकर आकुंचन पावण्यास मदत होते. स्तनपान करताना आईने बाळाशी गप्पा माराव्यात. त्यामुळे बाळाला बौध्दिक व मानसिक चालना मिळेल आणि आई बाळाचे छान नाते विकसित होईल. बाळाच्या भावी आयुष्यात त्याचे विविध आजारांपासून संरक्षण होऊ शकते.
- डॉ. स्मिता सांगडे, बालरोगतज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT