

Extortion case Pune
पुणे: ‘तुमच्याकडे खूप पैसा आहे, 50 लाख रुपये दे, अन्यथा तुला ठार मारेन,’ अशी धमकी देत एका व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी करणार्या आरोपीला मुंढवा पोलिसांनी अवघ्या 12 तासांत जेरबंद केलेे. पोलिसांनी सापळा रचून घोरपडी येथून त्याला बेड्या ठोकल्या.
अनिकेत अनिल पावल (वय 24, रा. भीमनगर, घोरपडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत घोरपडीतील व्यावसायिकाने फिर्याद दिली. फिर्यादी हे घोरपडीत वास्तव्यास असून लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून कार्यरत आहेत. तर, आरोपी पावल हा त्यांच्याच परिसरात राहायला आहे. 26 ते 29 जुलैदरम्यान फिर्यादी यांना एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅप कॉल व मेसेजद्वारे सतत धमक्या दिल्या जात होत्या. (Latest Pune News)
50 लाख रुपये दे, अन्यथा तुझा खून करीन, असे आरोपी वारंवार सांगत फिर्यादीवर पाळत ठेवत असल्याबाबत फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू महानोर यांच्यासह पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. त्यामध्ये आरोपीने गुन्हा केल्यानंतर आपला मोबाईल बंद करून फरार झाल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, आरोपी फिर्यादीला घोरपडीत भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी स्वप्नील रासकर आणि अक्षय धुमाळ यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक माया देवरे, सहाय्यक निरीक्षक राजू महानोर यांच्या पथकाने ही कारवाई केली.