डोणजे येथील वाहनतळावर चार्जिंगअभावी ई-बस उभ्या होत्या. 
पुणे

सिंहगडावर उडाला ‘ई-बस’चा बोजवारा

अमृता चौगुले

पुणे/ खडकवासला : पुढारी वृत्तसेवा

सिंहगडावरील प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या बहुचर्चित ई-बससेवेचा रविवारी (दि. 8) अक्षरशः बोजवारा उडाला. धोकादायक घाटात अचानक बंद पडणार्‍या बसमुळे पर्यटकांची गैरसोय झाली. पर्यटकांच्या संख्येत तब्बल सत्तर टक्क्यांनी घट झाली.
बसला चार्चिंग नसल्याने गडावरून खाली जाण्यासाठी दोन-दोन तास बस उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे गडाच्या वाहनतळावर पर्यटकांना कडक उन्हात तासन् तास उभे राहावे लागले. अतितीव्र घाटरस्त्यावर वाहतूक आणि चार्जिंगचे नियोजन कोलमडल्याने पीएमपीएलचे कर्मचारी, अधिकारीही हतबल झाले.

वनपरिमंडल अधिकारी बाबासाहेब लटके म्हणाले की, उन्हात घाटरस्ता चढून जाताना बसचे चार्जिंग वीस टक्क्यांवर येत आहे. त्यामुळे बसला चार्जिंगसाठी नेहमीपेक्षा अधिक वेळ लागला. पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी गडावर तसेच पायथ्याच्या ठिकाणी प्रत्येकी दोन चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

आणखी चार्जिंग स्टेशन उभारणार

याबाबत पीएमपी प्रशासनाला विचारले असता, किल्ल्यावर ई-बसकरिता आणखी चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याचे सांगण्यात आले. किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या गोळेवाडी पार्किंग येथेही चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच, गडावर पीएमपीच्या ई-गाड्यांमध्येदेखील वाढ करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

मित्र आणि परिवाराबरोबर सिंहगड किल्ल्यावर गेलो होतो. खासगी वाहनांना बंदी असल्याने ई-बसने आम्ही गडावर गेलो. गड फिरून झाल्यावर पुन्हा पार्किंग जवळ आलो. तेथे सहा ई-बस होत्या, परंतु एकही बस चार्जिंग नसल्याने आम्हाला तीन ते चार तास तेथेच थांबावे लागले. त्या वेळी गडावर तब्बल दोन ते अडीच हजार पर्यटक होते. पीएमपीएमएलने सुविधा सुधारणे गरजेचे आहे.

– सिद्धार्थ शेखर कुंजीर, पर्यटक, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT