वेल्हे : तोरणागडाच्या पायथ्यालगत निवी (ता. राजगड) येथे बिबट्याचे थरारनाट्य घडले. जनावरांची शिकार करण्यासाठी गोठ्यात शिरलेल्या धष्टपुष्ट बिबट्याला निराबाई रमेश गोऱ्हे (वय 50) यांनी हातात काठी घेत आरडाओरडा करीत पिटाळून लावले आणि आपल्या जनावरांचे प्राण वाचविले. हा प्रकार रविवारी (दि. 11) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडला.(Latest Pune News)
सकाळच्या स्वयंपाकानंतर भांड्याचे धुतलेले पाणी बाहेर टाकण्यासाठी पडवीत गेलेल्या निराबाईंनी गोठ्याच्या दाराजवळ बिबट्याला जाताना पाहिले. गोठ्यात शेळ्या, मेंढ्या, वासरे, गायी आणि बैल असल्याने त्यांनी क्षणातच धाडस दाखवीत काठी हातात घेतली आणि ती जमिनीवर जोराजोरात मारून आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्या काही क्षण थांबला. त्यानंतर निराबाईंनी शेजारच्या रहिवाशांना आरोळ्या दिल्या. रहिवासी धावत आले. सर्वांनी मिळून आरडाओरडा केल्याने बिबट्या जंगलात पसार झाला.
राजगड वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील लांगडे, परिमंडल अधिकारी वैशाली हाडवळे आणि तोरणा विभागाच्या वनरक्षक भाग्यश्री जगताप यांनी निराबाईंची भेट घेत त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. हाडवळे म्हणाल्या, ’गुंजवणी धरण खोऱ्यातील जंगलात बिबट्यासह अन्य वन्यजीवांचा अधिवास आहे. नागरी वस्त्यांत बिबट्या व हिंस्र प्राणी येऊ नयेत, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.
कोदापूर शेती सोसायटीचे अध्यक्ष भीमाजी देवगिरीकर म्हणाले, ’दोन जनावरांचा फडशा पाडल्यानंतर बिबट्या शिकारीसाठी निवी गावच्या रानात ठाण मांडून बसला आहे. परिसरात तीन ते चार बिबट्यांचा वावर आहे. मनुष्यहानी टाळण्यासाठी वन विभागाने खबरदारी घेणे आवश्यक आहे.’
शनिवारी (दि. 10) दुपारी रमेश सोमाजी गोऱ्हे यांचे एक बकरे व रमेश यांचे चुलतभाऊ सदाशिव सोमाजी गोऱ्हे यांचे एक वासरू अशा दोन जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला आहे.
बिबट्याला पिटाळून लावणाऱ्या निराबाई गोऱ्हे. दुसऱ्या छायाचित्रात निवी परिसरात बिबटविषयक जनजागृती करताना वन कर्मचारी.