पुणे: अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयाच्या भेसळखोरांविरुद्धच्या धडक कारवाईचा धसका घेऊन दुधातील भेसळीला चांगलाच अटकाव बसण्यास मदत झाल्याचे चित्र समोर येत आहे. कारण, दुधासह ब्रँडेड पनीर, दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत वाढ झालेली आहे.
हॉटेलांमध्येही ग्राहकांच्या जागरूकतेमुळे अनॉलॉग चीजऐवजी शुद्ध पनीरचा बोलबाला सुरू असून, ब्रँडेड पनीरला प्रथम पसंती देत तशी मागणीच नोंदवली जात आहे. त्यामुळे ब्रँडेड पनीरच्या विक्रीत वाढ झाल्याची माहिती दुग्धवर्तुळातून देण्यात आली.
गायीच्या दुधाचा खरेदीचा दर लिटरला ३९ रुपयांवर जाऊन स्थिरावला असला तरी नजीकच्या काळात आगामी श्रावण महिना, गौरी-गणपती सणामुळे दुधासह दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या ठोस कारवाईच्या पवित्र्यामुळे भेसळीच्या दुधाला मोठा अटकाव बसल्याचे सांगण्यात येत आहे. सुट्या स्वरूपात पनीरची होणारी विक्री जवळपास ५०टक्क्यांनी घटल्याचे सांगण्यात आले. त्याचा परिणाम ब्रँडेड पनीरच्या खरेदीस ग्राहकांचा कल वाढला असून, हॉटेलांमध्येही ग्राहकांकडून तशीच मागणी नोंदवली जात आहे. त्यामुळे पनीरच्या विक्रीत चाळीस टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती मिळाली.
राज्य दूध उत्पादक प्रक्रिया व कल्याणकारी संघाचे मानद सचिव प्रकाश कुतवळ म्हणाले, बाजारात पूर्वी अनॉलॉग चीजची विक्री प्रतिकिलोस २०० ते २५० रुपये दराने होत असे. आता या मालाच्या विक्रीला मोठा आळा बसला आहे. तर शुध्द पनीरचा दर प्रतिकिलोस मालाच्या प्रतवारीनुसार ३५० ते ४०० रुपये आहे. पूर्वी मिठाई दुकाने, छोट्या डेअऱ्या, दुकानदारांकडेही सुट्या पनीरची विक्री होत असे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईच्या धडक मोहिमेमुळे अशी सुटे पनीर विक्री बंद करीत ग्राहकांच्या मागणीनुसार या दुकानांमध्येही आता ब्रँडेड व पॅकबंद पनीरची विक्री होत आहे. त्यामुळेही शुध्द पनीरच्या खपात वाढ होण्यास मदत झालेली आहे. परिणामी पनीरसह दुग्धजन्य पदार्थनिर्मितीसाठी दूधखरेदीस स्पर्धा निर्माण झाल्याने आगामी काळात दूध खरेदी दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) दुधाच्या रोजच्या विक्रीत पहिल्यापेक्षा सुमारे पाच हजार लिटरने वाढ झाली. दर्जेदार मालामुळे ग्राहकांची पसंती कात्रजचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना कायम आहे. पनीरच्या रोजच्या विक्रीतही महिनाभरात १५ टक्क्यांनी वाढ झालेली आहे.मनोज लिमये, व्यवस्थापकीय संचालक, कात्रज दूध डेअरी