Adoshi Tunnel Pudhari
पुणे

Adoshi Tunnel: बोरघाटातील आडोशी बोगद्याचे मजबुतीकरण सुरू होणार

खडक कोसळल्यानंतर आयआयटी मार्गदर्शनाखाली सुरक्षा कामाला गती

पुढारी वृत्तसेवा

सुनील कडूसकर

पुणे: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटातील आडोशी बोगद्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी- पवई) मधील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार त्याच्या मजबुतीकरणाला सुरुवात केली जाणार आहे.

गेल्या 18 मार्च रोजी या बोगद्यातील छताचा बराच मोठा खडकाळ भाग कोसळल्याने काही वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. बोगद्यातील दगड व मातीचा राडा-रोडा बाजूला करून काही तासांतच वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मात्र, दगड कोसळलेला भागातील मुंबईकडे जाणारी एक मार्गिका (लेन) बॅरिकेड्‌‍स लावून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) तज्ज्ञांनी या बोगद्याचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, त्याचा अहवाल आयआयटी पवईकडे पाठविला आहे. त्यांच्याकडून सूचना मिळताच पुढील आठवड्यापासून बोगद्याचे मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे, असे एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दै. ‌’पुढारी‌’शी बोलताना सांगितले.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आडोशी येथे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हा बोगदा आहे. तर, पुण्याकडे येणारी वाहने या बोगद्यालगतच्या मार्गिकांचा वापर करतात. या बोगद्याच्या सुमारे शंभर ते सव्वाशे मीटर अंतरावर उजव्या बाजूच्या छताचा सुमारे 20 ते 25 फूट लांब आणि सुमारे 10 फूट रुंद भागातील खडक व माती गेल्या 18 मार्चला खाली कोसळली. घाटात दरडी कोसळण्याचे प्रकार तसे नेहमीच घडत असतात. परंतु, बोगद्यातील छताचा एवढा मोठा भाग ढासळण्याचा प्रकार प्रथमच घडला असून, ही मोठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे या मार्गावरील सर्वच बोगद्यांचे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आणि जिओटेक्निकल क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने सुरक्षा ऑडिट करावे, अशी मागणी जाणकारांकडून केली जात आहे.

संमिश्र प्रकारची संरचना

सह्याद्री पर्वत रांगेतील बोरघाटात एकाच प्रकारचे खडक नसून, ही खडकांची संरचना टप्प्याटप्प्याने बदलत गेलेली दिसते. खंडाळा ते खोपोलीदरम्यान असलेल्या या घाटात सुरुवातीच्या टप्प्यात अत्यंत टणक असा बेसॉल्ट खडक आढळतो. त्यात ड्रील घेऊन ब्लास्टिंग करणेही कठीण जाते. तर, खोपोलीकडे खाली खाली जाताना बऱ्याच भागात ठिसूळ खडकाची संरचना आढळून येते. दरडी कोसळण्याच्या सर्वाधिक घटना याच भागात घडल्या आहेत, असे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या एमएसआरडीसीच्या एका निवृत्त अधिकाऱ्यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात आडोशी बोगदा

  • लांबी- 263 मीटर

  • रुंदी - 14 मीटर

  • 23 नोव्हेंबर 2000 मध्ये पहिले ब्लास्टिंग - बोगद्याच्या खोदाईला सुरुवात.

  • 22 फेबुवारी 2001- शेवटचे ब्लास्टिंग- खोदाई पूर्ण

  • मजबुतीकरणासाठी शॉर्टक्रीट, बोल्टिंग आणि स्ट्रक्चरल कॉक्रीट लायनिंगचा वापर- तरीही छताचे खडक ढासळले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT