बोपदेव घाटातील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अख्तर ऊर्फ शोएब बाबू शेख (वय 27) व चंद्रकुमार कनोजिया (वय 20) या दोन आरोपींना पीडिता व घटनेच्या दिवशी जखमी झालेल्या तिच्या मित्राने ओळखले आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहात घेण्यात आलेल्या ओळखपरेड दरम्यान आरोपींची ओळख स्पष्ट झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, पोलिसांनी वानवडी येथील लष्कर न्यायालयात आरोपींविरोधात सोमवारी (दि. 2) पाचशे पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे.
आरोपींचा दरोडा आणि सामूहिक बलात्कार करण्याचा हेतू होता. ओळखपरेड दरम्यान गुन्ह्यात लुटण्यात आलेली सोनसाखळी तसेच वापरण्यात आलेला कोयता, एक काठी आणि गुन्ह्याच्या वेळी आरोपीने घातलेले कपडे व दुचाकी पीडिता व तिच्या मित्राला पुन्हा दाखवित त्याची ओळख पटविण्यात आली. याखेरीज, आरोपींचे शुक्राणू आणि रक्ताचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यासाठी डीएनए अहवालाची प्रतीक्षा आहे, असे तपास अधिकारी युवराज हांडे यांनी आरोपपत्राचा संदर्भ देत सांगितले.
वीस वर्षीय पीडिता आणि जखमी प्रत्यक्षदर्शी तिच्या मित्राचा जबाब भारतीय न्याय सुरक्षा संहिताच्या कलम 183 अन्वये दंडाधिकार्यांसमोर नोंदवले गेले आणि ते आरोपपत्रासोबत सीलबंद लिफाफ्यात जोडले गेले असल्याचे हांडे यांनी सांगितले. मित्राबरोबर बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर कोयत्याचा धाक दाखवून सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना तीन ऑक्टोबरला रात्री घडली होती.
त्यानंतर, पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत केली आहे. दरम्यान, लष्कर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. कुलकर्णी यांनी दोघांची न्यायालयीन कोठडीत एका पंधरवड्याने वाढ केली आणि प्रॉडक्शन वॉरंट जारी केले. आरोपपत्र सोपविण्याच्या पुढील प्रक्रियेसाठी पोलिसांनी त्यांना 16 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यास सांगितले.