

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकात घरफोडी, चोरीचे गुन्हे करणार्या जवाहरनगर येथील कुख्यात टोळीच्या म्होरक्यासह चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणने बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील 5 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
म्होरक्या गुरुदत्त शांतीनाथ पोळ (वय 43, रा. बिजली चौक जवाहरनगर), हरिश मधुकर पोळ (38, रा. जवाहरनगर), संजय मधुकर पोळ (47, रा. जवाहरनगर, सध्या रा. सुभाषनगर दिंडी वेस, मिरज), स्वप्निल सुरेश सातपुते (39, रा. क्रांती तरुण मंडळजवळ, यादवनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुरुदत्त पोळ याच्यावर 50, तर स्वप्निल सातपुते याच्यावर 22 गुन्हे दाखल असल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. या टोळीकडून 32 तोळे सोन्याचे दागिने, 186 ग्रॅम वजनाचे चांदीच्या दागिन्यांसह दोन मोटारसायकली, हत्यारासह 5 लाख 60 हजार 287 रु. किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. जेरबंद चार संशयितांशिवाय आणखी काही साथीदारांची नावे चौकशीत निष्पन्न होत आहेत. त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असेही कळमकर म्हणाले. इस्पुर्ली व मिरजेतील गांधीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी व चोरीच्या दोन गुन्ह्यांची या टोळीने कबुली दिली आहे. संशयित कळंबा परिसरातील कात्यायनी मंदिर परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, खंडेराव कोळी, नवनाथ कदम, बालाजी पाटील, दीपक घोरपडे, शिवानंद स्वामी यांच्या पथकाने सापळा रचून संशयितांना जेरबंद केले. या सराईत टोळीने सीमाभागातही गंभीर गुन्हे केले असावेत, असा संशय आहे.