पुणे: पुणे रेल्वे स्थानकासह अन्य दोन ठिकाणी (येरवडा आणि भोसरी) परिसरात बॉम्ब ठेवण्यात आला असल्याची धमकी देणारा निनावी फोन बुधवारी सकाळी नऊ वाजता आला. स्थानिक पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बल खडबडून जागे झाले अन् संपूर्ण रेल्वे स्थानकाची दिवसभर तपासणी केली.
दरम्यान, या घटनेचा कोणताही परिणाम रेल्वे सेवेवर झाला नसल्याची माहिती विभागीय वाणिज्य व्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी आणि वरिष्ठ रेल्वे सुरक्षा आयुक्त प्रियंका शर्मा यांनी दिली. पुणे रेल्वे स्टेशन, भोसरी आणि चैतन्य महिला मंडळ येथे बॉम्बस्फोट करणार असल्याचा कॉल पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी (दि. 20) रात्री आला होता.
त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आली. दरम्यान, बॉम्बस्फोटाच्या धमकीने खळबळ उडाल्यानंतर तत्काळ रेल्वे स्टेशन परिसरासह संबंधित ठिकाणी स्थानिक पोलिस, बीडीडीएस (बॉम्ब शोधक आणि नाशक पथक) आणि श्वानपथकाने तपासणी करून परिसर पिंजून काढला. प्राथमिक तपासात हा फोन खोडसाळपणाचा प्रकार असल्याचा संशय असून पोलिस कॉलरचा शोध घेत आहेत.(Latest Pune News)
नियंत्रण कक्षात रात्री एक निनावी कॉल आला. समोरील व्यक्तीने पुणे रेल्वे स्टेशन, भोसरी आणि येरवड्यातील चैतन्य महिला मंडळ येथे स्फोट घडवून आणण्यात येणार आहे. कॉलरने इतके सांगून फोन कट केला.
या माहितीची गंभीर दखल घेत नियंत्रण कक्षाने संबंधित ठिकाणच्या पोलिस ठाण्यांना तत्काळ सूचित केले. यानंतर स्थानिक पोलिस, बॉम्ब शोध पथक आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. बंडगार्डन पोलिसांकडून पुणे रेल्वे स्टेशन परिसरात तपासणी करण्यात आली.
यादरम्यान निनावी कॉल करणार्या व्यक्तीचा नंबर त्वरित ट्रेस करण्यात आला. त्या क्रमांकाचे विश्लेषण करता तो एक महिलेच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. उल्हासनगर- कुर्ला प्रवासात असल्याचे समोर आले. महिलेचा फोन घेऊन कोणीतरी दुसर्याने हा खोडसाळपणा केल्याचा संशय पोलिसांना आहे. संबंधित कॉलरचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांनी दिली.