आळंदी : पुढारी वृत्तसेवा
कोयाळी भानोबाची (ता. खेड) हद्दीत काळेवस्ती भागातून गेले चार दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या तरुणाचा अखेर खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा मृतदेह बुधवारी (दि. १६) भीमा नदी पात्रात निकम वस्ती कोयाळी येथे आढळून आल्याची माहिती आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली आहे.
लक्ष्मण यशवंत शिंदे (वय ३१) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी सुनील जयवंत पांढरे, कोंडीबा लहू काळे, संतोष लहू काळे, शिवाजी पांडुरंग कोळेकर (सर्व रा. कोयाळी, काळेवस्ती) यांना अटक केली आहे. या गुन्ह्यात अद्याप अजून काही आरोपी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून तसा तपास सुरू आहे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लक्ष्मण शिंदे यांच्या २७ वर्षीय पत्नीने फिर्याद दिली आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे दिसून येत असल्याचे आळंदी पोलिसांनी सांगितले असून तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करत आहेत.
Lassa fever : लासा फिव्हरनं नवजात बालकाचा मृत्यू, हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना आयसोलेट होण्याचा सल्ला!