पुणे : स्व. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असून भारतीय जनता परिवर्तन पार्टी हा नवीन राजकीय पक्ष स्थापन केला असल्याची माहिती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. नीलेश निढाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ॲड. निढाळकर म्हणाले, भाजपमध्ये भारत भ्रष्टाचारमुक्त देश करण्याचे उदिष्ट होते. परंतु, पक्षामध्ये खरे कार्यकर्ते बाजूला राहिले असून भ्रष्टाचारी नेत्यांना स्थान देऊन त्यांना पदे दिली जात आहेत. या सर्वाचा विचार करून या पक्षाची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र धर्म व हिंदुस्थानचे स्व. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजधर्माची संकल्पना या मूल्यांवर आधारित असून, देशातील राजकारणात नैतिकता, पारदर्शकता व जनसेवा यांची पुनर्स्थापना करणे हा पक्षाचा मुख्य उद्देश आहे.
राजकारण हे सत्तेसाठी नव्हे तर सेवेकरिता असले पाहिजे. सामान्य नागरिकाला न्याय, सुरक्षा व सन्मान मिळवून देणे हाच आमचा राजधर्म आहे. पक्षाचा भर प्रामुख्याने भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, शेतकरी व कामगार यांना न्याय, महिला सुरक्षा व युवक रोजगार व संविधानिक मूल्यांचे संरक्षण यावर राहील. लवकरच पक्षाची नोंदणी भारत निवडणूक आयोगाकडे करण्यात येणार असून, राज्यभर सदस्य नोंदणी व जनसंपर्क अभियान सुरू केले जाईल.
या पक्षाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीसाठी कायदेशीर चौकट, हमीभावाची अंमलबजावणी, शेती उत्पादन खर्चावर आधारित दर, महिला सुरक्षेसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट, महिलांना आर्थिक स्वावलंबन, राजकारणात ३३ टक्के प्रतिनिधित्वासाठी पाठपुरावा, युवकांसाठी स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास व स्टार्टअप सहाय्य, सरकारी भरती प्रक्रियेत पारदर्शकता, न्याय व्यवस्था, सामान्य माणसाला स्वस्त व जलद न्याय, पोलिस सुधारणा, कायद्याचा गैरवापर थांबवणे, प्रशासन, भ्रष्टचारावर शून्य सहनशीलता, ई-गव्हर्नन्स, लोकाभिमुख प्रशासन आदी विषयांवर हा पक्ष काम करणार असल्याचे ॲड. निढाळकर यांनी या वेळी सांगितले.