रामदास डोंबे
खोर(पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बंडानंतर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत दुफळी निर्माण झाली असून, जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात अक्षरशः उभी फूट पडली आहे. राज्यातील राष्ट्रवादीच्या फुटीमुळे सर्वच तालुक्यात मतांचे विभाजन झाले आहे. त्यामुळे दोघांचे भांडण आणि तिसर्याचा लाभ अशीच स्थिती आता प्रत्येक तालुक्यात पाहावयास मिळत आहे
. दौंड तालुक्यातदेखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बंडानंतर पक्षाची मोठी हानी झाली आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी, जनसेवक सर्वच बुचकळ्यात पडले असून, दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचा निष्ठावंत प्रत्येक कार्यकर्ता विचारपूर्वक निर्णय घेऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात जपून पाऊल टाकत आहे.
दौंड तालुक्यातदेखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली गेली असून, माजी आमदार रमेश थोरात व तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार तसेच विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांच्यातदेखील गट निर्माण झाले आहे. प्रत्येकाने आपले मार्ग मोकळे करून घेतले आहेत. आजची परिस्थिती पाहता दौंड तालुक्यातून सर्वांत जास्त पसंती ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळताना दिसत आहे.
असे असताना जुने निष्ठावंत कार्यकर्तेदेखील शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे आहेत असे बोलले जात आहे. प्रत्येक सुख-दुःखाच्या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यात दौरा घेत प्रत्येक दोन महिन्याच्या आत प्रत्येक गावन्गाव पिंजून काढत जनतेपर्यंत जाण्याचे काम केले. मात्र, आता तालुक्यात मतभिन्नता झाली आहे. या दोघांच्या भांडणात तिसर्याचा म्हणजे भाजपचा मोठा फायदा होणार असल्याचे भविष्यातील चित्र निर्माण झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच आपला पक्ष असल्याचा दावा करीत असल्याने सन 2024च्या विधानसभा निवडणुकीत दौंड तालुक्यात शरद पवार यांच्या गटात सध्या तरी तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार हाच एकमेव चेहरा आगामी विधानसभा निवडणुकीत पुढे आहे. पक्षाने जर तालुक्यात तिकीट दिले, तर अप्पासाहेब पवार हेच एकमेव समर्थक आहेत. त्यामुळे त्यांची पक्षातील जागा आताच्या घडीला निश्चित मानली जात आहे. दुसरीकडे शिंदे-फडणवीस-अजित पवार युतीत जर ही जागा भाजपाला आली, तर दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल हाच एकमेव चेहरा आहे.
त्यामुळे नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार गटात सामील झालेले दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचे नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. कारण उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व कट्टर समर्थक म्हणून आमदार राहुल कुल यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. तसेच राहुल कुल हे अजित पवार यांचे भाचे -जावई आहेत.
जरी अजित पवार व राहुल कुल हे दुरावले गेले असले, तरी आताच्या घडीला एकत्र आले असल्याने नात्याची घडी पुन्हा बसली जाणार का ? हेदेखील बघावे लागणार आहे. त्याचवेळी माजी आमदार रमेश थोरात नेमकी काय भूमिका घेणार हे महत्त्वपूर्ण असून, रमेश थोरात भविष्यात विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणार का ? हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरेल.
आगामी निवडणुकीत महिलांना संधी देण्यात आली, तर राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांचादेखील आमदराकीसाठी विचार होऊ शकतो. त्यामुळे राज्याच्या राजकारणात दौंडच्या जागा वाटपाबाबत सावध भूमिका घेतली जाणार हे नक्की.
हेही वाचा