नगर : व्यापार्‍यांच्या पोटावर पाय देऊ नका | पुढारी

नगर : व्यापार्‍यांच्या पोटावर पाय देऊ नका

नगर : पुढारी वृत्तसेवा : मार्केट यार्डमधील दोनशे व्यापारी गाळे पाडण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिल्यानंतर या प्रकरणाचा पाठपुरावा करणार्‍या शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांचा व्यापार्‍यांनी निषेध केला. व्यापार्‍यांना रस्त्यावर आणू नका. राजकारण राजकीय पातळीवरच करा. परंतु, व्यापार्‍यांच्या पोटावर पाय देऊ नका, अशी भावना यावेळी व्यापार्‍यांनी व्यक्त केली. मार्केट यार्डमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व्यापार्‍यांनी घोषणा देत शुक्रवारी आंदोलन केले. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती ही एक स्वायत्त संस्था आहे. तिलाही स्वतःचे काही अधिकार आहेत.

बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी कांदा मार्केटचे स्थलांतर झाल्यानंतर ही जागा मोकळ्या अवस्थेत रिकामी पडली होती. बाजार समितीने नियमानुसार पूर्वीचे कांदा शेड येथे पत्र्याचे शेड उभारून व्यापार्‍यांना करारानुसार, तसेच उपनिबंधक कार्यालयात रजिस्टर करण्यात आले. त्यानुसार व्यापारी बाजार समितीचे सर्व कर भरत आहेत. मात्र, शिवसेनेचे पदाधिकारी दिलीप सातपुते, शशिकांत गाडे, योगिराज गाडे, संदेश कार्ले आणि बाळासाहेब हराळ हे शहरातील मार्केट यार्ड येथील गाळे पाडून जवळपास दोन हजारपेक्षा जास्त लोकांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करत मार्केट यार्ड येथे व्यापार्‍यांनी त्यांचा निषेध नोंदविला. तशा आशयाचे फलक यावेळी झळकविण्यात आले.

यावेळी राजेंद्र चोपडा, विशाल पवार, राजेंद्र बोथरा, नितीन शिंगवी, बबलू नवलानी, धनेश कोठारी, विजय मुनोत, बाळासाहेब दरेकर, रमेश इनामकर, भरत पवार, गणेश कोठारी, प्रसाद बोरा, निनाद औटी, मनोज राका, प्रीतम नवलानी, राहुल सोनीमंडलेचा, सुरेश कर्पे, अभय लुणिया, महवीर छाजेड, मनीषा दर्डा, विशाल दाभाडे, दिनेश सोनी मंडलेचा, बाळासाहेब पवार आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्यापार्‍यांचा आत्मदहनाचा इशारा
हे गाळे पाडल्यास व्यापारी व कामगांरासह जवळपास दोन हजारांपेक्षा जास्त लोक रस्त्यावर येणार आहेत. याबाबत संतप्त भावना व्यक्त करतानाच वेळ पडल्यास सर्व व्यवसाय बंद करून सामूहिक आत्मदहन करण्याचा इशाराही यावेळी व्यापार्‍यांनी दिला.

Back to top button