पुणे: आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी इच्छुकांची रांग लागली असतानाच त्यावरून शहर भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत खटकाखटकी उडाली. अन्य पक्षातील इच्छुकांना घेण्याऐवजी पक्षातील निष्ठावंताना उमेदवारी द्या अशी मागणी एका ज्येष्ठ आमदाराने केली. त्यावरून मतभेद निर्माण झाल्याने अखेर आवश्यकता असेल तिथेच सर्वांना विश्वासात घेऊन पक्षप्रवेश घेतले जातील असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकीच्या तयारी संदर्भात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, महापालिका निवडणूक प्रमुख धीरज घाटे, खासदार मेधा कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह कमिटीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत वारजे भागातील राष्ट्रवादी कॉंग््रेास शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेवकाने भाजप प्रवेशाच्या अप्रत्यक्ष संदेश देणारे फलक लावले होते. त्यावरून एका ज्येष्ठ आमदाराने आपण अन्य पक्षातील इच्छुकांना पक्षात घेण्याऐवजी आपल्याच पक्षातील निष्ठावंताना संधी द्यावी अशी भूमिका घेतली.
त्यावर अन्य एका वरिष्ठ नेत्याने तुम्ही आता मन मोठे करायला पाहिजे. ज्या ठिकाणी अन्य पक्षातील निवडून येण्याची क्षमता असलेले इच्छुक असेल तर ते आपल्याला घ्यावे लागतील असे स्पष्ट केले. त्यावरून बैठकीत काहीशी गरमागरमी झाली. अखेर संबंधित आमदारांनी पक्षात घ्यायचेच असेल तर अन्य कोअर कमिटीला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा असे सांगत पुढे जाऊन अडचण नको असा नाराजीचा सूर व्यक्त करत चर्चेला विराम दिला.
दरम्यान कोअर कमिटीतील मतभेदांमुळे पक्षप्रवेशाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. भाजपमध्ये वडगाव शेरी, शिवाजीनगर, खडकवासला, कोथरूड या मतदार संघातील अनेक माजी नगरसेवक व पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे. त्यामुळे धस्तावलेल्या भाजपाच्या इच्छुक उमेदवारानी त्यास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे संभाव्य पक्षप्रवेश थांबवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, मध्यंतरी पुणे दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रभागात पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार नाही, तिथे अन्य पक्षातील इच्छुकांना पक्षात घेऊन संधी दिली जाईल, असे स्पष्ट करीत पक्षप्रवेशांना ग््राीन सिग्नल दिला होता.
दरम्यान कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी पक्षप्रवेशावरून बैठकीत कोणतेही मतभेद अथवा वादविवाद झाले नसल्याचे स्पष्ट केले. आगामी काळात सर्वांना विश्वासात घेऊन पक्षात काही पक्षप्रवेश निश्चितपणे होतील असे त्यांनी सांगितले.