Pune Municipal Elections 2025 Maharashtra Politics
सुनील माळी, पुणे
राज्यातील महापालिकांची आगामी निवडणूक महायुती म्हणून लढण्याची घोषणा भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असली, तरी महायुतीतील पक्षांचे कमीअधिक बळ लक्षात घेता अनेक ठिकाणी जागावाटपात जबरदस्त संघर्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यासारख्या ठिकाणी तर निवडणुकीतील प्रतिस्पर्ध्याशी दोन हात करण्याआधीच राजकीय पटावर युतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्याशी चाली-प्रतिचालींचे, शह-काटशहांचे युद्ध फडणवीस यांना खेळावे लागणार आहे. या युद्धाचे रणशिंग फुंकले जाईल ते नवी प्रभागरचना करताना कोणाचा वरचष्मा राहणार या निर्णयापासून, तिचा पहिला बाण सोडला जाईल ते जागांचा अधिकाधिक वाटा आपल्या पदरात पडण्यासाठी होणार्या खटपटीच्या वेळी आणि शेवट होईल, जेव्हा पक्षाच्या हक्काच्या जागांवर युतीतल्या दुसर्या पक्षातील प्रबळ इच्छुकांची बंडखोरी होईल किंवा टाळली जाईल तेव्हा...
‘राज्यातील महापालिकांच्या निवडणुका शक्यतो आम्ही महायुती म्हणूनच लढू’, अशी घोषणा फडणवीस यांनी तीन-चार दिवसांपूर्वीच पुण्यात केली. अगदी काही ठिकाणीच युती होणार नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. युती म्हणून निवडणूक लढल्यास भाजप, अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची एकत्रित ताकद अनेक महापालिकांची सत्ता सहजी खेचू शकेल, अशी अटकळ त्यांच्या त्या वक्तव्यामागे असणार आणि विरोधकांशी लढताना मतांची फूट टाळण्याचा त्यांचा हेतूही त्यांच्या द़ृष्टीने स्वाभाविक असाच आहे. मात्र, प्रत्यक्षात एकत्र निवडणूक लढणे किती अवघड जाणार आहे, हे वेगवेगळ्या महापालिकांमधील सद्यस्थिती पाहता लक्षात येते. पुण्यात तर भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची सणसणीत ताकद आहे. या दोन्ही पक्षांचे इच्छुक, प्रमुख कार्यकर्ते अनेक ठिकाणी एकाच प्रभागातील उमेदवारीचा आग्रह धरणार आहेत. त्यामुळे युतीतील जागावाटप हा युद्धापूर्वीच्या युद्धाचा खेळ ठरणार आहे.
पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादीची ताकद कशी आहे, ती पाहू. महापालिकेची गत निवडणूक झाली ती 2017 मध्ये. यात 162 जागांपैकी तब्बल 98 जागा जिंकून भाजपने पहिल्यांदाच पुणे महापालिकेत एकहाती सत्ता मिळवली. म्हणजे एकूण जागांच्या 60.49 टक्के जागा भाजपने मिळवल्या. भाजप आपल्या इतर प्रतिस्पर्ध्यांची धूळधाण करीत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र आपली ताकद फारशी कमी होऊ दिली नाही. निवडणुकीत त्यांचे 41 जण विजयी झाले व 11 गावांच्या हद्दीवाढीनंतर वाढलेल्या दोन प्रभागांतील जागांपैकी एक जागा मिळवल्याने तो पक्ष 42 पर्यंत पोहोचला.
राष्ट्रवादीची ताकद प्रामुख्याने उपनगरांत अधिक आहे. खडकवासला, हडपसर, वडगाव शेरी मतदारसंघांत या पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या. मुळात पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत परंपरेने या पक्षाचे मतदार बहुसंख्येने असून तिथून स्थलांतरित झालेला वर्ग शहरात आल्यावरही आपल्या मूळ म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसशीच प्रामाणिक राहिला. हडपसर विधानसभा मतदारसंघात 14, तर खडकवासला मतदारसंघात 13 जण राष्ट्रवादीकडून निवडून आले. याचाच अर्थ एकूण 42 जागांपैकी तब्बल 27 जागा एकट्या राष्ट्रवादीनेच पटकावल्या.
परिस्थिती अशी आहे की, राष्ट्रवादीचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आलेल्या भागांतही गेल्या काही काळात भाजपचे उत्तम संघटन झाले आहे आणि भाजपने नगरसेवकांचा जवळजवळ शतकी आकडा ज्या भागांच्या जोरावर पार केला, त्या भागांत राष्ट्रवादीची ताकदही चांगली आहे. दोन्ही पक्षांकडे समर्थ इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे आणि युतीमध्ये प्रत्येक जागेसाठी दबाव आणण्यासाठी, वादंग करण्यासाठी, कार्यकर्त्यांची ताकद दाखवण्यासाठी जो तो जीव तोडून प्रयत्न करणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच स्वबळावर निवडणूक लढवण्याची मागणी विशेषत: भाजपच्या कार्यकर्त्यांकडून होते आहे.
भाजप-राष्ट्रवादीच्या मुत्सद्देगिरीचा पहिला कस लागेल तो प्रभागरचना होत असताना. प्रभागरचना ही निव्वळ प्रशासकीय प्रक्रिया आहे, असे जाहीरपणे सर्वच जण सांगतात; पण ती निखालस खोटी बाब आहे, हे सर्वच अनुभवी जाणतात. पुण्यात मोठ्या कौशल्याने करण्यात आलेली प्रभागरचना आता बदलली जाणार असून, यावेळी त्याकडे या दोन्ही पक्षांचे लक्ष राहील, एवढे मात्र नक्की. कोथरूड, कसबा विधानसभा मतदारसंघांत भाजपचे असलेले वर्चस्व राष्ट्रवादी मान्य करेलही, पण इतर ठिकाणी आणि अगदी भाजपने जिंकलेल्या जागांपैकी अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रबळ इच्छुक हक्क सांगणार हेही वास्तव आहे. शेवटी प्रत्येक जागा कुणातरी एका पक्षाच्या वाट्याला जाणार असली, तरी तिथे दुसर्या पक्षाची बंडखोरी होण्याची आणि काँग्रेस-उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला आयते उमेदवार मिळण्याचीही शक्यता आहे. एकूणच, फडणवीस यांनी पुण्यात घातलेले विशेष लक्ष, अजित पवार यांची आक्रमक शैलीतील तयारी आणि वेगाने जवळ येणारी निवडणूक यामुळे पुण्याच्या राजकीय मंचावरील खेळ चांगलाच रंगू लागण्याची चाहूल लागली आहे.
फडणवीसांची सावध भूमिका
या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुती साकारण्याची प्रक्रिया सहजासहजी होणार नाही. अर्थात, याची फडणवीस यांना जाणीव असल्यानेच त्यांनी ‘काही ठिकाणी तुल्यबळ उमेदवार असतील त्या जागांचा अपवाद करून इतर ठिकाणी युती होईल’, अशी सावध भूमिका घेतली आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आणि शहरांच्या उपनगरांमध्ये अजित पवार यांची चांगलीच ताकद असल्याने आपल्या घरच्या जिल्ह्यातील महापालिकांसाठी ते आग्रही राहणार, यात शंका नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्यावेळी जरी भाजपला बहुमत मिळाले असले, तरी तो भागही परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे तिथेही भाजप-राष्ट्रवादी यांच्यात रस्सीखेच होणार यात शंका नाही.